सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला 'फाइव्ह स्टार' झळाळी!, पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा; मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 12, 2026 19:13 IST2026-02-12T19:12:43+5:302026-02-12T19:13:18+5:30
पर्यटन आराखड्याचे सादरीकरण

सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला 'फाइव्ह स्टार' झळाळी!, पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा; मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या प्रस्तावित पंचतारांकित (५ स्टार) हॉटेल प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग येणार आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून तो तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सक्रिय होण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात गुरुवारी (दि.१२) विशेष आढावा बैठक पार पडली. २३ डिसेंबर २०२५ रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि प्रलंबित बाबींवर चर्चा करून प्रशासकीय त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला आणि स्थानिक रोजगार निर्मितीला या प्रकल्पामुळे गती मिळणार आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, 'सिस्टुला ट्यूलिप पीएलसी'चे अध्यक्ष माइक बेरी आणि संचालक अमित कामत उपस्थित होते.
तांत्रिक अडथळे दूर होणार
या प्रकल्पाच्या मार्गातील प्रलंबित तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून प्रकल्पाचा मार्ग सुकर करण्याचे निर्देश यावेळी यंत्रणांना देण्यात आले.
पर्यटन आराखड्याचे सादरीकरण
जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे बैठकीत सविस्तर सादरीकरण झाले. सिंधुदुर्गला जागतिक स्तरावर पर्यटनाचे 'हब' बनवण्यासाठी कोणत्या दर्जेदार सुविधा आवश्यक आहेत, यावर बैठकीत विशेष चर्चा झाली.
प्रशासकीय समन्वयावर भर
जिल्हा प्रशासन आणि गुंतवणूकदार संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांना प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी जलद गतीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यात उच्च दर्जाच्या सुविधांची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. पंचतारांकित हॉटेल प्रकल्पातील तांत्रिक बाबी लवकरात लवकर निकाली काढून प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. यातून जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार वाढीस लागेल. - नितेश राणे (मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री)