भराडी मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 07:30 IST2022-02-25T07:29:55+5:302022-02-25T07:30:40+5:30
यावर्षी एसटी महामंडळाच्या संपाचा फटका भाविकांना बसला.

भराडी मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक
सिद्धेश आचरेकर
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेला गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मध्यरात्री तीनपासून हजारो भाविकांनी आई भराडीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंगणेवाडी भराडी देवीचा वार्षिकोत्सव केवळ आंगणे कुटुंबीयांपुरता मर्यादित स्वरूपात ठेवला होता. मात्र, कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर यंदा आंगणेवाडीची जत्रा भाविकांच्या गर्दीत गजबजून गेली आहे. भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात होती. दुपारच्या सत्रात गर्दी वाढू लागली होती. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी भल्या पहाटे विविध नऊ रांगातून दर्शन घेतले.
एसटी संपाचा भाविकांना फटका
दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात कणकवली, मालवण आणि मसुरे अशा तीन स्वतंत्र स्टँडवरून शेकडो एसटी बस भाविकांना अहोरात्र सेवा देतात. यावर्षी एसटी महामंडळाच्या संपाचा फटका भाविकांना बसला.
व्हीआयपींची गर्दी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, परिवहन मंत्री अनिल परब, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, आ. आशिष शेलार, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, नीतेश राणे, राजू पाटील, विनायक मेटे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दर्शन घेतले.