शल्यचिकित्सकांच्या अनुपस्थितीवरून सदस्य आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:41 IST2020-12-01T17:39:12+5:302020-12-01T17:41:16+5:30
hospital, sindhudurgnews, kudal, hospital सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक अथवा त्यांचा प्रतिनिधी सभेला उपस्थित नसल्याने त्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. यावर आम्ही रिकाम टेकडे आहोत का ? आम्हांला कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे येतो का? अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

शल्यचिकित्सकांच्या अनुपस्थितीवरून सदस्य आक्रमक
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील एका खासगी रुग्णालयावर मागील महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी धाड टाकल्याचे प्रकरण आरोग्य समिती सभेत सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी चर्चेत आणले. तसेच ही धाड योग्य होती का? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक अथवा त्यांचा प्रतिनिधी सभेला उपस्थित नसल्याने त्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. यावर आम्ही रिकाम टेकडे आहोत का ? आम्हांला कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे येतो का? अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच पुढील सभेस जिल्हा शल्य चिकित्सकांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी सूचना सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सदस्य राजेश कविटकर, लॉरेन्स मान्येकर, नूतन आईर, हरी खोबरेकर, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
मागील महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी कुडाळ तालुक्यातील एका खासगी रुग्णालयावर धाड टाकली होती. ही धाड कायदेशीर होती का ? की मागील रोष मनात ठेवून टाकण्यात आली होती? असा प्रश्न सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी आरोग्य समिती सभेत उपस्थित केला व याबाबत माहिती मागितली. मात्र, या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने मान्येकर यांना आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
यावर त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्हा शल्य चिकित्सकांना सभेचे निमंत्रण देण्यात आले नव्हते का? आणि सभेला कोण कोण अनुपस्थित आहेत हे पाहणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच आम्ही रिकाम टेकडे आहोत का ? आम्हांला कामधंदा नाही म्हणून आम्ही येथे येतो का? अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच पूर्वीची दुष्मनी काढून खासगी डॉक्टरांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी त्रास देऊ नये असा इशारा दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सतर्क रहावे
लेप्टो आजाराचा आढावा घेतला असता जिल्ह्यात चालू महिन्यात लेप्टो साथीत वाढ झाल्याचे दिसून आले. महिनाभरात ८७ लेप्टोसदृश रुग्ण आढळून आले आहेत. यात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ५६ रुग्ण, कणकवली १७, वैभववाडी २, देवगड २, मालवण ४, सावंतवाडी २ आणि दोडामार्ग ४ रुग्णांचा समावेश आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मात्र, ही लाट जिल्ह्यात येऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, अशी सूचना सदस्य हरी खोबरेकर यांनी केली.