Sindhudurg: साहेब खर सांगतो, विद्युत विभागाची कामे झाली नाहीत, उपविभागीय अभियंत्यांनी दिली कबुली; वरिष्ठांची चिडीचूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:23 IST2025-06-28T18:22:02+5:302025-06-28T18:23:30+5:30
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील विद्युत विभागांच्या वाढत्या तक्रारींबाबत सावंतवाडीत बैठक

Sindhudurg: साहेब खर सांगतो, विद्युत विभागाची कामे झाली नाहीत, उपविभागीय अभियंत्यांनी दिली कबुली; वरिष्ठांची चिडीचूप
सावंतवाडी : साहेब खर सांगतो पण एप्रिल मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे करायची असतात ती कामे झाली नाहीत. त्यामुळेच विजेचे प्रश्न उद्भवले आहेत अशी स्पष्ट कबुली विद्युत विभागाचे दोडामार्ग उपविभागीय अभियंता विशाल हत्तरंगी यांनी देत विद्युत विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाची त्याच्या समक्ष पोलखोल केली. या अधिकाऱ्यांच्या कबुली जबाबाने विद्युत विभागाचे वरिष्ठ चिडीचूप बसल्याचे दिसून आले.
आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील विद्युत विभागांच्या वाढत्या तक्रारींबाबत सावंतवाडीत बैठक घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी हेमंत निकम, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब आदींसह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी दोडामार्ग येथील विजेच्या लपडावाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले. त्यावेळी उप कार्यकारी अभियंता हंत्तरगी यांनी मे महिन्यात मान्सून पूर्व काम झाली नाहीत ही वस्तूस्थिती आहे. तुमच्याशी खोटं बोलणार नाही अशी कबुली दिली. मात्र, ही काम आता अंतिम टप्प्यात आहेत. कंत्राटदारांच्या टीम कार्यरत आहेत. वाहन, ट्री कटर व इतर सामुग्रीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आडाळीतील वीज वाहिनीचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समस्या तात्काळ सोडवण्याची सुचना केसरकर यांनी दिली.
वेंगुर्ले येथील भूमिगत वाहिन्यांच्या पॅनलचा त्रास
वेंगुर्ला येथिल भूमिगत वाहिन्यासाठी उभारलेल्या पॅनलचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केला. अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यानं वालावलकर आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊन ते का पूर्ण होत नाहीत? अधिकाऱ्यांना ग्राऊंडवरची माहिती नाही असेही म्हणाले. यावेळी केसरकर यांनी मध्यस्थी करत यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले.