पेट्रोलच्या दराद्वारे सरकारकडून लूट

By Admin | Updated: October 29, 2015 00:14 IST2015-10-28T22:14:45+5:302015-10-29T00:14:22+5:30

जयेंद्र परूळेकर : लिटरला ३० रूपये जास्त; जिल्हाभर आंदोलन उभारणार

Looted by the government at petrol prices | पेट्रोलच्या दराद्वारे सरकारकडून लूट

पेट्रोलच्या दराद्वारे सरकारकडून लूट

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाचे दर उतरलेले असून, प्रतिलिटर ३७.५० पैसे पेट्रोलचे दर होण्याऐवजी शासनाने ५९ रुपयांपर्यंत पोहोचविलेले आहेत. यामुळे प्रतिलिटर पेट्रोलवर ३० रूपये वाढवून सरकार कोणाच्या घशात घालवत आहे, असा सवाल करीत आम जनतेला लुटण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे पेट्रोल भ्रष्टाचार विरोधात येत्या काही दिवसांत जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी दिला आहे.
माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, युवक शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचा दर २५ रूपये आहे. शुद्धीकरण व ट्रान्स्पोर्टसाठी ६ रूपये प्रतिलिटर, केंद्र सरकार टॅक्स ६ रूपये, राज्य सरकार टॅक्स ५ रूपये, तर डिलर कमिशन प्रतिलिटर दीड रूपया यामुळे पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ३७.५० पैसे एवढी असणे आवश्यक आहे. ही रक्कम ४० रूपये घ्या. मात्र, प्रतिलिटर ६९ रूपये घेऊन शासन आम जनतेची फसवणूक करीत आहे. शेजारच्या गोवा राज्यात पेट्रोलचे दर १४ रूपयाने कमी आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य पेट्रोलचे दर वाढवून फसवणूक करीत आहे.
पदासाठी शिवसेना-भाजपमध्ये उडी मारणाऱ्या सुरेश प्रभू यांनी लोकसभेसाठी येथे उभे रहावे, जनता त्यांना जागा दाखवून देईल, असे आव्हान यावेळी डॉ. परूळेकर यांनी दिले.
शिवसेनेने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भाषणात, आम्ही सत्तेतून बाहेर पडतो, अशा मनोगताची अपेक्षा होती. असे झाले तर ते खरे स्वाभिमानी शोभले असते. मात्र, मुंगळ्या चिकटून बसतात, तशी सत्तेसाठी चिकटून बसलेली लोचट शिवसेना, अशी जहरी टीकाही परूळेकर यांनी केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी जे काम केले, त्यातून फडणवीस सरकारच्या कानाखाली बसली. त्याचा आवाज ऐकू आला नाही. मात्र, हाच आवाज शेतकऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहचला, असा टोला यावेळी परुळेकर यांनी युती सरकारला हाणला. (वार्ताहर)

Web Title: Looted by the government at petrol prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.