Sindhudurg: करूळ घाटात दरड कोसळली, तासभर ठप्प झाली होती वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:39 IST2025-08-14T13:38:12+5:302025-08-14T13:39:06+5:30
मुसळधार पावसामुळे दगडमातीचा मोठा भराव दोन ठिकाणी रस्त्यावर आला

Sindhudurg: करूळ घाटात दरड कोसळली, तासभर ठप्प झाली होती वाहतूक
वैभववाडी : दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे करूळ घाटात बुधवारी(ता.१३) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
तालुक्यात मंगळवार(ता. १२)पासून पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्याचा फटका करूळ घाटमार्गाला बसला. सायकांळी ४ वाजण्याच्या सुमारास करूळ घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दगडमातीचा मोठा भराव दोन ठिकाणी रस्त्यावर आला होता. बहुतांशी रस्ता या भरावाने व्यापला होता.
कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्यात झाडांचाही समावेश होता. त्यामुळे संपूर्ण महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात केली. तासभरात दरडीचा अर्ध्या भाग हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर दरडीचा उर्वरित भाग हटवून सायंकाळी संपूर्ण मार्ग मोकळा केला. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने घाटमार्गात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे.