विकास की स्थानिकांवर कुऱ्हाड

By Admin | Updated: July 14, 2014 00:01 IST2014-07-14T00:00:24+5:302014-07-14T00:01:33+5:30

परुळे, चिपीतील घरांना धोका : ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल

Kurchad of development locals | विकास की स्थानिकांवर कुऱ्हाड

विकास की स्थानिकांवर कुऱ्हाड

रजनीकांत कदम : कुडाळ षपरुळे, चिपी येथील जनतेच्या घरादारांचा विचार न करता विमानतळाच्या बांधकामासाठी परवानगी नसतानाही अतितीव्रतेचे सुरूंग स्फोट केले जात आहेत. हे अतितीव्रतेचे सुरूंग स्फोट विमानतळाच्या बांधकामासाठी केले जात आहेत की येथील जनतेची घरे उद्ध्वस्त करण्यासाठी केले जात आहेत? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे जनतेच्या भावना समजून न घेता अधिकाऱ्यांकडून सुरुंग स्फोट केले जात असल्याने परुळे, चिपी परिसरातील नागरिकांकडून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी, परुळे येथे विमानतळ उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. नियोजित २७२ हेक्टर जमिनीत अपेक्षित असलेला हा विमानतळ प्रकल्प सुरूवातीपासूनच अनेक वादांनी ग्रासलेला आहे.
सुरूवातीपासून आतापर्यंत चिपीच्या विमानतळसंदर्भात महत्त्वाचा वाद आहे तो म्हणजे येथील विमानतळ प्रकल्पासाठीची जमीन. आवश्यकता नसतानादेखील ९३३ हेक्टर एवढी अतिरिक्त जमीन ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना वेगवेगळी कारणे देऊन घेण्यात आली. या जमिनीच्या सातबारावरील नोंदी पेन्सिलने घातल्या होत्या. विमानतळाला आवश्यक असणारी २७२ हेक्टर जमीन घ्या आणि अतिरिक्त घेतलेल्या जमिनी परत करा, या मागणीकरिता ग्रामस्थांनी आंदोलनही केले आहे. कवडीमोल दराने घेतलेल्या जमिनी परत मिळण्यासाठी तसेच पेन्सिल नोंद रद्द करण्याबाबत येथील जनता आंदोलन करीत आहे. याचबरोबर येथील जनतेला विमानतळाच्या बांधकामामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथे करण्यात येणाऱ्या अतितीव्रतेच्या स्फोटामुळे येथील घरांना तडे जात आहेत.
या विमानतळाच्या धावपट्टीचे तसेच इतर काम करीत असताना कमी तीव्रतेचे सुरूंग स्फोट करावेत. अतितीव्र सुरूंग स्फोट करू नये, असा आदेश असतानाही येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनी याचे उल्लंघन करीत आहे. या सुरूंग स्फोटामुळे येथील जनतेला त्रास होत असून हे स्फोट करू नये म्हणून येथील जनेतेने वारंवार आंदोलने केली आहेत. परुळे, चिपी येथील जनतेने आंदोलन छेडल्यावर कंपनीकडून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी एक इंचही जमीन विमानतळासाठी देण्यात येणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्यावर कंपनीकडून नरमाई बाळगण्यात आली. स्फोटामुळे तडे गेलेल्या घरांची पाहणी करुन त्यांना नुकसान भरपाई देण्याचेही कबूल करण्यात आले.
मात्र, अद्यापही कंपनीने चिपीतील कोणत्याही नुकसानग्रस्तांना भरपाई दिली नाही आणि नुकसानग्रस्त घरांची पाहणीही केलेली नाही. येथील जनतेच्या समस्या कधीही समजावून घेतल्या नाहीत. अतितीव्रतेचे भूसुरूंग स्फोट थांबविले नाहीत. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी जाब विचारण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. परंतु भेट नाकारल्याने येथील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला व बुधवारी आयआरबीच्या कंपनीच्या सुभाष पाटील यांना धक्काबुक्की झाली.
कवडीमोल किंमतीने आमच्या शेतजमिनी घेऊन शेतीव्यवसाय संपविला. आता अतितीव्रतेचे सुरूंग स्फोट करून घरे उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन अधिक तीव्र स्वरुपाचे करणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. येथील जनतेच्या आंदोलनामुळे एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे लोणकर व पाटील यांनी, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे
आश्वासन दिले.

Web Title: Kurchad of development locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.