कुडाळ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदारांनी शिंदेसेना आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. कोकणवासीयांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे. वंदन करायला आलो आहे. कोकणात विधानसभेच्या १५पैकी १४ जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिंदेसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला. हिंदुत्त्वाच्या मुळावर उठलेल्या उद्धवसेनेची मशाल मतदारांनी कायमची विझवून टाकली. त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. असेच प्रेम कायम ठेवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी रात्री केले. कुडाळ येथील एसटी आगाराच्या मैदानावर झालेल्या आभार यात्रेत ते बोलत होते.विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गच्या जनतेने महायुतीला भरघोस मताधिक्य दिले. जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी शिंदेसेनेच्या दोन आमदाराना मतदारांनी कौल दिला. त्यामुळे या मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेसेनेचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार यात्रेच्या माध्यमातून कुडाळ येथे आले होते. पहलगाम येथील पर्यटकांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये होते. त्या ठिकाणाहून ते गुरुवारी रात्री गोवा थेट येथील मोपा विमानतळावर उतरले. रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांचे कुडाळ येथील सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी आंब्यांचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, आमदार नीलेश राणे, आमदार किरण सामंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, बाळा चिंदरकर, उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, आनंद शिरवलकर,वर्षा कुडाळकर, ॲड. नीता कवीटकर, संजय पडते, प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर, दीप्ती पडते, साक्षी परब, अपूर्वा सामंत, अशोक दळवी, महेश कांदळगावकर, प्रेमानंद देसाई, संजू परब, दादा साईल तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकटसमयी जायचे नाही तर कधी जायचे ?शिंदे पुढे म्हणाले, मी काश्मीरमध्ये लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस आल्यासारखे वाटले. त्यांना धीर आला. विरोधक टीका करतात. पण, संकटसमयी त्या ठिकाणी जायचे नाही तर मग कधी जायचे. तिकडे लोकांना भेटल्यानंतर त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या. त्यांना विश्वास आला की, आता आम्ही सुरक्षितपणे आमच्या घरी जाऊ शकतो आणि तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप माघारी आणू शकलो.
पंतप्रधान दहशतवाद्यांना योग्य धडा शिकवतीलपहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा खरे म्हणजे हा कुठल्या व्यक्तीवर नाही, तर देशावर झालेला हल्ला आहे आणि याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची भावना आहे. हा नवा भारत आहे. घुसके मारेंगे असे सांगून आर पार घुसवणारा भारत आहे. त्यामुळे या ठिकाणी जशास तसे उत्तर त्यांना पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
नीलेश राणेंच्या खांद्यावर सेनेचा भगवाशिंदे म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखे वाटते. तसा अनुभव या ठिकाणी येतो आणि म्हणून हा भगवा इथे डौलाने फडकतो आहे. या भगव्यासाठी जान कुरबान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत. आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे. नीलेश राणे हे फणसासारखे आहेत. बाहेरून कठोर दिसत असले तरी आतून प्रेमळ आणि गोड आहेत. शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेला आहे. स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे.
कोकणचे मार्केटिंग, ब्रँडिंग करायला शिकाआपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे. मच्छिमार, शेतकरी, बागायतदार यांचा फायदा झाला पाहिजे. हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोकणी माणसाने आता आपल्या कोकणचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग करायला शिकले पाहिजे. कोकणात आलेला माणूस पर्यटनासाठी पुन्हा पुन्हा आला पाहिजे, यासाठी आपण काम केले पाहिजे. त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून या लाल मातीमध्ये प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आहेत. आज कोकणामध्ये आपण कोस्टल रोडचे काम सुरू केले आहे. रेवस ते रेडी महामार्गाचे काम सुरू आहे. पुढच्या वेळेस येईन तेव्हा तुम्ही बोलवाल त्या वेळेच्या अर्धा तास अगोदर येईन, असा विश्वास त्यांनी सर्वांना दिला.