Sindhudurg: दरड कोसळल्याने करुळ घाट १२ सप्टेंबरपर्यंत बंद; वाहतूक भुईबावडा, फोंडा घाटमार्गे वळविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:41 IST2025-09-05T13:40:41+5:302025-09-05T13:41:43+5:30
परतीच्या प्रवासातील गणेशभक्तांना फटका

Sindhudurg: दरड कोसळल्याने करुळ घाट १२ सप्टेंबरपर्यंत बंद; वाहतूक भुईबावडा, फोंडा घाटमार्गे वळविली
वैभववाडी : मुसळधार पावसामुळे करूळ घाटात गुरुवारी सकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास दरड कोसळली. दगडमातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या गणेशभक्तांना मोठा फटका बसला.दरम्यान, ब्रेकर आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, १२ सप्टेंबरपर्यंत हा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
घाट परिसराला बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गुरुवारी सकाळीही ७ वाजेपासून घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. या पावसामुळे करूळ घाटात सकाळी ८० वाजेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. दगड, मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याने ५० ते ६० मीटर रस्ता व्यापला . यामुळे तळेरे- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, परतीच्या प्रवासाला निघालेले गणेशभक्त कोल्हापूरमार्गे पुणे-मुंबईकडे या घाटमार्गाने जात होते. त्यांना अर्ध्या घाटातून माघारी परतून भुईबावडा, अणुस्कुरा, फोंडाघाट या मार्गांचा पर्याय निवडावा लागला. दरड कोसळल्याची माहिती वैभववाडी पोलिसांना मिळताच त्यांनी एडगाव येथून भुईबावडामार्गे, तर अवजड वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ९ वाजेच्या सुमारास घाटात पोहोचले. त्यानंतर दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात करण्यात आली; परंतु दरडीमध्ये मोठ्या दगडांचा समावेश असल्याने ते ब्रेकरच्या साहाय्याने फोडून हटविले जात आहेत. याशिवाय दरीमध्ये दगड ढकलल्यास रस्ता खचण्याचा धोका असल्याने कोसळलेले दगड व माती डंपरमध्ये भरून दुसरीकडे नेली जात आहे.
तहसीलदार, पोलिस निरीक्षकांकडून घाटात पाहणी
घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. करुळ घाटात गुरुवारी सकाळी मोठी दरड कोसळली. तसेच घाटमार्गात सातत्याने दरडींची पडझड सुरु असल्यामुळे १२ सप्टेंबरपर्यंत हा घाटमार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या काळात करुळ घाटमार्गाची वाहतूक भुईबावडा आणि फोंडा घाटमार्गे सुरु राहणार आहे. त्यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी आदेश जारी केला आहे. दरम्यान या घाटमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तज्ञांचे पथक बोलावण्यात येणार आहे.