कर्नाटकची मासेमारी नौका पाठलाग करुन पकडली; आठ खलाशी ताब्यात, गिर्ये समुद्रकिनारी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 15:34 IST2026-03-12T15:33:41+5:302026-03-12T15:34:00+5:30
पथकाला पाहताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गस्ती पथकाने थरारक पाठलाग करून नौकेला जेरबंद केले

कर्नाटकची मासेमारी नौका पाठलाग करुन पकडली; आठ खलाशी ताब्यात, गिर्ये समुद्रकिनारी कारवाई
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अवैध मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत. १० मार्च रोजी रात्री देवगड सागरी हद्दीत गिर्ये समोरील क्षेत्रात कर्नाटक राज्यातील ‘श्री सानिध्या’ ही ट्रॉलिंग नौका बेकायदेशीर मासेमारी करताना रंगेहाथ पकडण्यात आली. पथकाला पाहताच नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गस्ती पथकाने थरारक पाठलाग करून नौकेला जेरबंद केले.
ही नौका कर्नाटकच्या गणेश बंगेरा यांच्या मालकीची असून, तिला केवळ कर्नाटक राज्याच्या हद्दीत मासेमारीचा परवाना आहे. मात्र, ही नौका महाराष्ट्राच्या हद्दीत १७ ते १८ फॅदम खोलीवर ट्रॉलिंग करत होती. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली असून, जप्त मासळीचा लिलाव देवगड बंदरात करण्यात आला.
मध्यरात्री थरार
रात्री १०:३०च्या सुमारास गस्ती पथक गिर्ये समुद्रात असताना ही नौका आढळली. पथकाने पाठलाग करून नौका ताब्यात घेतली आणि देवगड बंदरात आणली. तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कडक कायदेशीर पाऊल
परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. याचा अहवाल सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे दिला जाणार असून, नौका मालकावर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
स्थानिक मच्छीमारांना दिलासा
पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार परप्रांतीय मासेमारीविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.