Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:17 IST2025-12-21T12:35:46+5:302025-12-21T13:17:13+5:30
Kankavali Local Body Election Result 2025: कुटुंब एकाबाजूला होते आणि निवडणूक एका बाजूला होती. कणकवलीसह मालवणमध्येही ज्यांनी आमच्या विजयात हातभार लावला त्यांचे आणि जनतेचे आभारी आहोत असं नीलेश राणेंनी सांगितले.

Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपालिकेच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपाविरोधात सर्वपक्षीय शहर विकास आघाडी बनवण्यात आली. त्यात पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. या निवडणुकीत शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले आहेत. पारकर यांच्या विजयाने मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.
या निकालावर नीलेश राणे म्हणाले की, हा विजय एकट्याचा नाही तर जनतेचा विजय आहे. आजचा दिवस विजयाच आहे. एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे अशी भावना आहे. आम्ही शहर विकास आघाडी म्हणून लढलो असलो तरी भाजपाचा पराभव झाला आहे. मालवणमध्ये आम्ही जिंकलो त्याचा आनंद आहे. सोबतच कणकवली आमचे काही लोक पराभूत झाले त्याचे दु:खही आहे. संदेश पारकर जिंकले त्याबद्दल अभिनंदन, परंतु समोरही आपलेच होते. नात्यातले होते. कुटुंब एकाबाजूला होते आणि निवडणूक एका बाजूला होती. मालवणमध्येही ज्यांनी आमच्या विजयात हातभार लावला त्यांचे आणि जनतेचे आभारी आहोत असं त्यांनी सांगितले.
भाजपाविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याची चर्चा
कणकवली येथील या निवडणुकीत भाजपाविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचे चित्र राज्याने पाहिले. या निवडणुकीत भ्रष्टाचाराविरोधात आमची लढाई आहे असं सांगत शहर विकास आघाडी बनवण्यात आली. त्यात कधी काळी ठाकरे गटाचे नेते असलेले संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार बनवले होते. त्यात शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नीलेश राणे यांनी शहर विकास आघाडीचा प्रचार करताना थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. चव्हाणांमुळे महायुती झाली नाही असा आरोपही त्यांनी केला होता.
पैसेवाटपाचा आरोप
या निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नीलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात जात स्टिंग ऑपरेशन केले होते. यात भाजपा मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या बातमीने महायुतीत शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात तणाव वाढला होता. नीलेश राणे यांनी थेट चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे कणकवली निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले. एकूण १५ जागांपैकी ८ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.