निष्ठावंताना डावलून बाहेरचे उमेदवार घेतले ही चुकच, विनायक राऊत यांची कबुली; राजन तेलींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 17:41 IST2025-07-19T17:39:41+5:302025-07-19T17:41:20+5:30
'मी लोकसभेतील पराभवानंतरही येथील शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम केले. पण माझे कोण नाव घेणार नाही'

निष्ठावंताना डावलून बाहेरचे उमेदवार घेतले ही चुकच, विनायक राऊत यांची कबुली; राजन तेलींना टोला
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीत निष्ठावंताना डावलून बाहेरचे उमेदवार घेतले ही आमची चूक होती. याचे परिणाम आज आम्हाला भोगावे लागत आहे. पण आज ही निष्ठावंत कुठेही बाजूला गेला नाही आणि भविष्यात जाणार ही नाही असा विश्वास उद्धवसेनेचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. माजी आमदार राजन तेली हे सावंतवाडीतील पराभवानंतर मतदारसंघात फिरकले नसल्याने हा अप्रत्यक्ष टोला लगावला.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, कुडाळ माजी नगराध्यक्ष मंदार शिरसाट, श्रेया परब, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, अशोक धुरी, तालुकाप्रमुख बाळू परब, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, अनुप नाईक, निशांत तोरसकर आदी उपस्थित होते.
विधानसभेला उमेदवार असणारे शिवसैनिक पक्षात सक्रीय नाहीत तसेच काही भाजपच्या वाटेवर असल्याबाबत विचाले असता राऊत म्हणाले, स्वतःला विकायला ठेवलं आहे असे विकाऊ राजकारणी बाजारात आहेत. माल विकायला ठेवतात तसे ते बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. मात्र, निष्ठावंतांची फळी कमी झालेली नाही. विधानसभेला धडा शिकल्यानं निष्ठावंतांची किंमत आम्हाला कळून चुकली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गेले वर्षभर मतदारसंघात फिरकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आमच्या आता सर्व घटना लक्षात आल्या आहेत पण आम्ही भविष्यात सुधारणा करू असेही राऊत यांनी सांगितले. मी लोकसभेतील पराभवानंतरही येथील शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम केले. पण माझे कोण नाव घेणार नाही असा खोचक टोलाही लगावला.