शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:41 IST2025-08-07T14:40:55+5:302025-08-07T14:41:22+5:30
जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप

शक्तिपीठ महामार्गावरून सावंतवाडीतील जनतेला धोका?, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका
सावंतवाडी : चष्मा कारखाना, सेटऑप बॉक्स, मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल यांसारख्या आश्वासनांप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग मळगाव आणि तिलारीकडे विभागून नेणार, असे गाजर दाखवून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर जनतेची पुन्हा एकदा दिशाभूल करत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
डाॅ. परुळेकर यांनी म्हटले की, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, युवा वर्गात वाढत चाललेली व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेची खराब स्थिती व परप्रांतीय लोकांच्या ताब्यात जाणाऱ्या जमिनी हे मतदारसंघामधील जनतेचे वेगळेच प्रश्न आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की आमदारांनी शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलून आंबोलीमार्गे मळगाव किंवा झिरो पॉइंट येथे आणि तिथून तिलारी व रेडी जेटीपर्यंत नेण्याची विनंती सरकारला केली आहे, परंतु ही एक निव्वळ भूलथाप आहे.
ज्या सरकारच्या काळात राज्यातील कंत्राटदारांचे ९० हजार कोटी रुपये आणि जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये थकले आहेत, अशा परिस्थितीत ८६ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाची गरज कोणाला आहे? हा महामार्ग जनतेच्या किंवा पर्यटनाच्या फायद्यासाठी नाही, तर सत्ताधारी राज्यकर्त्यांचे उखळ पांढरे करण्यासाठी आहे का? असा शंका त्यांनी व्यक्त केली.
डॉ. परुळेकर यांनी एक धक्कादायक बाबही समोर आणली आहे की, भविष्यात सावंतवाडी तालुक्यातून तब्बल सहा महामार्ग जाणार आहेत. यात मुंबई-गोवा महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, सागरी महामार्ग, संकेश्वर-बांदा महामार्ग, पनवेल-बांदा महामार्ग आणि सह्याद्री महामार्ग यांचा समावेश आहे.
आमदारांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष
वीजपुरवठा खंडित होणे, युवा वर्गात वाढती व्यसनाधीनता, आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था आणि परप्रांतीय लोकांकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होत असल्याच्या गंभीर समस्या याकडे आमदारांचे लक्ष नाही, असं डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे।