Sindhudurg: आडाळी एमआयडीसीतील गोल्फ कोर्स प्रकल्पाविरोधात एल्गार, जनआंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:13 IST2025-11-10T16:11:42+5:302025-11-10T16:13:12+5:30
गोल्फ कोर्स नकोच, उद्योग हवा

संग्रहित छाया
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीत गोल्फ कोर्ससारखा प्रकल्प उभारण्याचा घाट शासनाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येताच तालुक्यातील युवक-युवतींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. औद्योगिक विकासाच्या नावाखाली रोजगाराच्या आशेवर पाणी फेरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत युवकांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, इच्छुक असलेल्या ४९ उद्योजकांना येत्या पंधरा दिवसांत उद्योग उभारणीसाठी परवानगी द्यावी. अन्यथा सोळाव्या दिवशी मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दोडामार्ग शहरातील श्री गणेश मंदिर येथे रविवारी सकाळी एक बैठक पार पडली. या बैठकीत आडाळी एमआयडीसीतील अन्यायकारक कारभार आणि गोल्फ कोर्स प्रकल्पाच्या निर्णयावर चर्चा झाली. या वेळी उपस्थित सर्वांनी एकमुखी ठराव करून, शासनाने आमच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या प्रकल्पांना परवानगी दिली, तर रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा दिला. यावेळी आडाळी औद्योगिक विकास कृती समितीचे अध्यक्ष पराग गावकर, सचिव प्रवीण गावकर, दोडामार्ग तालुका हेल्पलाइन ग्रुप अध्यक्ष वैभव इनामदार, यांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आडाळी एमआयडीसी हा उद्योगांसाठी राखीव परिसर असून, तो मनोरंजनासाठी नव्हे. येथे उद्योग उभारण्यास तयार असलेल्या ४९ उद्योजकांना अजूनही प्रत्यक्षात काम सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. महामंडळाचे काही अधिकारी जाणूनबुजून या उद्योजकांना भूखंड आणि परवानग्यांबाबत टाळाटाळ करत आहेत, असा गंभीर आरोप या बैठकीत करण्यात आला. गोल्फ कोर्ससाठी परवानगी द्यायची आणि उद्योगांसाठी अर्ज केलेल्या उद्योजकांना महिनोनमहिने फिरवायचे, हे कसले उद्योगधोरण? असा सवाल संतप्त पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
गोल्फ कोर्स नकोच, उद्योग हवा
शासनाने उद्योग उभारणीच्या माध्यमातून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, ही आमची मागणी आहे. उलटपक्षी, गोल्फ कोर्ससारखा प्रकल्प आणून उद्योगधंद्यांपासून लक्ष विचलित केले जात आहे. हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. कासा ब्लांकासारखी कंपनी येथे उद्योग सुरू करण्यास तयार आहे. या कंपनीत डीओ स्प्रेसाठी लागणाऱ्या कॅनचे उत्पादन होणार असून, सुमारे २०० ते ३०० स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. शिवाय इतर अनेक उद्योजकही आडाळीत उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत. मात्र, शासन याकडे दुर्लक्ष करत आहे