- संदीप बोडवे
लोकमत न्यूज नेटवर्क
मालवण : मालवण-वेंगुर्ला जवळील निवती रॉक समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ स्थापित करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. १८ मेपासून स्कटलिंगच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एमटीडीसी चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्या देखरेखीखाली माझगाव शिप बिल्डर्सचे तंत्रज्ञ हे काम पूर्ण करणार आहे. नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचा अशाप्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील हा पहिलाच उपक्रम असून, सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाचा नवा इतिहास लिहिला जाणार आहे.
गुलदारचे होणार प्रवाळ बेटात रुपांतर
८१ मीटर लांब, २२ मीटर उंच आणि १,२०० टन विस्थापन असणारी गुलदार ही युद्धनौका जवळपास २२ मीटर खोलीच्या समुद्रात स्थापित करण्यात येणार आहे. गुलदार युद्धनौका दक्षिण दिशेकडे म्हणजे गोव्याच्या दिशेने तोंड करून समुद्रतळाशी स्थापित केली जाणार आहे. बुडालेल्या युद्धनौकेचे प्रवाळ बेटात रूपांतर होऊन त्यावर सागरी जीवसृष्टीचा अधिवास नैसर्गिकरीत्या तयार व्हायला साधारणता दोन वर्षांचा कालावधी लागेल.
घटनाक्रम
डिसेंबर २०२४ मध्ये केंद्राकडून सिंधुदुर्गमधील आर्टिफिशियल रीफ व अंडर वॉटर म्युझियम या पर्यटन प्रकल्पासाठी ४६.९१ कोटींचा निधी मंजूर
२२ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज आयएनएस गुलदार हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले.
१६ मार्च २०२५ रोजी विजयदुर्ग येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जेटीवर सुरक्षितरीत्या आणण्यात आली.
१५ एप्रिलपर्यंत या गुलदार वरील घातक घटकांची पर्यावरणीयदृष्ट्या साफसफाई पूर्ण व अन्य परवाने मिळविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात.
१६ एप्रिल रोजी स्कटलिंगसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना कार्यादेश
१९ जून २०२५ रोजी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला..
पाणबुडीतून दिसणार नजारा
पाण्याखालील युद्धनौकेचे प्रवाळबेट आणि अंडरवॉटर म्युझियम पाहण्यासाठी निवती रॉक समुद्रात बार्ज उभा केला जाईल. पर्यटकांना एमटीडीसीच्या बोटीमधून या बार्जवर नेले येईल. तिथून पाणबुडीत बसून पाण्याखाली बुडालेले अद्भुत असे गुलदार युद्धनौकेचे विहंगम दृश्य पाहता येईल. स्कुबा डायविंग करूनही बोट पाहता येईल. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे एमटीडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अशी असेल प्रक्रिया
विजयदुर्ग बंदरात उभी असलेली गुलदार रविवारी टग बोटींच्या साहाय्याने नियोजित ठिकाणी आणण्यात येत आहे. नियोजित ठिकाणी येताच तिला अँकरिंग केले जाईल.
त्यानंतर बोटीच्या सर्व बाजूने मोठे एअर बलून लावून या बोटीला स्थिर करण्यासाठी सपोर्ट देण्यात येणार आहे. त्यानंतर गुलदार पाण्याच्या पातळीवर येऊन थांबेपर्यंत त्यात समुद्राचे पाणी भरले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युद्धनौकेच्या सर्व बाजूने असलेल्या मोठ्या एअर बलूनमधील हवा नियंत्रित पद्धतीने हळूहळू कमी करण्यात येईल.
जसजशी हवा कमी होत जाईल, तसतशी युद्धनौका समुद्राच्या तळाशी विसावली जाणार आहे. स्कटलिंगच्या या प्रक्रियेत युद्धनौका समुद्र तळाशी स्थिर ठेवणे हे आव्हानात्मक काम असेल.
Web Summary : Retired naval ship INS Guldar will be scuttled near Malvan-Vengurla to create an underwater museum and artificial reef. This unique initiative aims to boost marine tourism in Sindhudurg. The ship will transform into a coral reef, fostering marine life over two years.
Web Summary : सेवानिवृत्त नौसेना जहाज आईएनएस गुलदार को मालवन-वेंगुर्ला के पास समुद्र के नीचे संग्रहालय और कृत्रिम चट्टान बनाने के लिए डुबोया जाएगा। इस अनूठी पहल का उद्देश्य सिंधुदुर्ग में समुद्री पर्यटन को बढ़ावा देना है। जहाज दो वर्षों में एक प्रवाल भित्ति में बदल जाएगा, जिससे समुद्री जीवन को बढ़ावा मिलेगा।