भारतीय नौदलाचे तारकर्लीत ४ डिसेंबरला शक्तीप्रदर्शन; २० युद्धनौका, ४० विमाने मिग २९ के, एलसीए नेव्ही प्रमुख आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 14:10 IST2023-11-30T14:09:48+5:302023-11-30T14:10:29+5:30
संदीप बोडवे मालवण: जलमेव यस्य, बलमेव तस्य (जो समुद्र नियंत्रित करतो तो सर्व शक्तीशाली आहे). या ब्रिदाला अनुसरत भारतीय ...

भारतीय नौदलाचे तारकर्लीत ४ डिसेंबरला शक्तीप्रदर्शन; २० युद्धनौका, ४० विमाने मिग २९ के, एलसीए नेव्ही प्रमुख आकर्षण
संदीप बोडवे
मालवण: जलमेव यस्य, बलमेव तस्य (जो समुद्र नियंत्रित करतो तो सर्व शक्तीशाली आहे). या ब्रिदाला अनुसरत भारतीय नौदल ४ डिसेंबर रोजी भारताच्या पश्चिम सागरी किनार्यावरील मराठा आरमाराचा मानबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ शक्ती प्रदर्शन करणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी तारकर्ली समुद्रकिनारी केले आहे. या प्रात्यक्षिकास केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, लष्करी मान्यवर आणि स्थानिक लोक साक्षीदार असणार आहेत. आपला समृद्ध सागरी इतिहास साजरा करून त्याचा गौरव करणे आणि वसाहतवादी प्रथा दूर करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आरमाराचा मानबिंदू सिंधुदुर्ग किल्ला ..
मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६६० मध्ये बांधलेला, सिंधुदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाचा अभिमान बाळगतो. नौदल या किल्ल्याच्या साक्षीने आपल्या कार्यप्रणालीचे आपल्या बलस्थानासह प्रात्यक्षिक आयोजित करून तो अभिमान सार्थ ठरवीत आहे.
नौदल दिनाचा इतिहास..
४ डिसेंबर रोजीचा नौदल दिन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या साहसी हल्ल्याच्या "ऑपरेशन ट्रायडंट" ची आठवण म्हणून साजरा केला जातो. या ऑपरेशन डेमोचे आयोजन जवानांचे शौर्य , धैर्य आणि प्रतिकूल परिस्थितीत अशक्य ते साध्य करण्याचा त्यांचा संकल्प साजरा करण्यासाठी केला जात आहे. या कार्यक्रमात भारतीय नौदलाची अत्याधुनिक जहाजे आणि विमाने सामान्य लोकांना प्रत्यक्ष आणि ऑनलाइन दर्शकांना थेट प्रक्षेपणाद्वारे पाहता येणार आहेत .
सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार लेझर शो..
या कार्यक्रमात तेजस, मिग २९ के आणि एलसीए विमानांचा समावेश असलेल्या ४० विमानांसह २० युद्धनौका सहभागी असतील तसेच भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोद्वारे भर समुद्र तसेच किनाऱ्यावरील शोध आणि बचाव कार्य तसेच शत्रूवर प्राणघातक हल्ल्याचे प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण असेल . इतर प्रमुख आकर्षणांमध्ये नौदल बँडचे प्रदर्शन, एससीसी कॅडेट्सचे सातत्यपूर्ण ड्रिल आणि हॉर्न पाईप नृत्य यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचा समारोप लंगरवर जहाजांना रोषणाई करून त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शो द्वारे होणार आहे .
पहिल्यांदाच तळा पासून दूर..
या मेगा इव्हेंटचे भारतीय नौदल पहिल्यांदाच कोणत्याही नौदल तळापासून दूर आयोजन करत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे स्थान मुंबईपासून ५५० किमी आणि गोव्यातील नौदल तळापासून १३५ किमी अंतरावर आहे. या कार्यक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनासह नौदलाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.