कणकवलीत गुरांची अवैध वाहतूक रोखली; बजरंग दल, भाजपा कार्यकर्ते आक्रमक
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 21, 2023 13:27 IST2023-08-21T13:27:02+5:302023-08-21T13:27:51+5:30
कणकवली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

कणकवलीत गुरांची अवैध वाहतूक रोखली; बजरंग दल, भाजपा कार्यकर्ते आक्रमक
सिंधुदुर्ग : कणकवलीहुन निपाणीच्या दिशेने बोलेरो पिकअप मधून गुरांची अवैध वाहतूक करत असताना फोंडाघाट चेक पोस्टवर पोलिसांनी अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला. ही गुरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी गुरे अडवून चौकशी केली असता तब्बल १८ गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळतात फोंडाघाट चेकपोस्टवर स्थानिक ग्रामस्थांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. अखेर बोलेरोमध्ये असणाऱ्या काही तरुणांना गाड्या सह कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
फोंडा घाट चेक पोस्टवर पिकअप कार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी दिगंबर घाडीगावकर यांनी तपासणी करता अडवली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ रितेश गांधी, प्रवीण पडेलकर, निखिल तेली, नीरज नानचे, प्रथमेश लाड, विशाल रेवडेकर, शंकर पारकर, महेश सावंत, हेमराज तिरोडकर, व बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कणकवली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अखेर पोलिसांकडून याप्रकरणी अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.