मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात - नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:46 IST2018-01-05T17:42:06+5:302018-01-05T17:46:09+5:30
मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे बोलत होते.

मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात - नारायण राणे
कुडाळ: मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाबाबत बोलायचे झाल्यास मागील तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा दहा वर्ष मागे गेल्याची आजची स्थिती आहे. निवडणुकांच्या काळात करण्यात आलेला जाहीरनामा व घोषणांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असून येथील महसूल विभाग जनतेचे शोषण करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. तसेच, येथील अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. याचबरोबर, विमानतळाचे काम संथगतीने सुरु आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाची सुद्धा तशीच अवस्था आहे. एमआयडीसीचे काम सुरू नाही. जिल्हा नियोजन कामाला कट बसला आहे, असे सांगत नारायण राणे यांनी या सर्वाला जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार धरले आहे. पालकमंत्र्यांना अधिकारी ऐकत नाहीत हे दुर्दैव असून गेल्या तीन वर्षात शून्य काम असणारे निष्क्रिय पालकमंत्री असल्याची टीका नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. तसेच, कोकणात होवू घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला सुद्धा नारायण राणे यांनी विरोध दर्शविला आहे. याचबरोबर, नारायण राणे यांनी मंत्रिपदाबद्दल सूचक वक्तव्य करताना सांगितले, की मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल.
दरम्यान, स्वाभिमान पक्ष सभासद नोंदणी 1 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. राज्यात पक्ष संघटना वाढवत असताना जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या जागा आणि खासदार विजयी करणे, हा स्वाभिमान पक्षाचा संकल्प आहे. तसेच, स्वाभिमान पक्षाचे संपर्क अभिमानही सुरू होणार असल्याचेही यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.