या झोपडीत माझ्या : कुडाळ-आंदुर्ले गाव नॉट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:02 IST2020-10-06T11:59:16+5:302020-10-06T12:02:08+5:30
Education Sector, mobile network, sindhudurgnews कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावात कुठल्याच कंपनीचे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने आॅनलाईन अभ्यासासाठी तेथील विद्यार्थी गावातील डोंगरात ज्याठिकाणी नेटवर्क मिळते तेथे झोपडी बांधून अभ्यास करीत आहेत.

गावात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने आंदुर्ले येथील विद्यार्थी डोंगरावर झोपडी बांधून अभ्यास करीत आहेत.
कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले गावात कुठल्याच कंपनीचे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने आॅनलाईन अभ्यासासाठी तेथील विद्यार्थी गावातील डोंगरात ज्याठिकाणी नेटवर्क मिळते तेथे झोपडी बांधून अभ्यास करीत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आंदुर्ले गावात दूरसंचारच्या मनोऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. एकीकडे आपला देश फोरजी वरून ५जी नेटवर्कची स्वप्ने पाहत असताना अजूनही काही गावात मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे तेथे नेटवर्कच्या एका एका काडीसाठी रानोमाळ भटकावे लागत आहे.
अशाच प्रकारची स्थिती कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावात दिसून येत आहे. कोरोनामुळे सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. पण आंदुर्ले गावात मोबाईल मनोराच नसल्याने नेटवर्कसाठी विद्यार्थ्यांना रानोमाळ भटकत फिरावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान आणि हाल होत आहेत.
आंदुर्ले गावातील दूरसंचारच्या मनोऱ्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने दूरसंचारची सेवा ठप्प आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यास सुरू असल्याने मोबाईल नेटवर्कअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच नोकरदारांचेही हाल होत आहेत. नोकरदारवर्ग गावच्या सीमावर्ती भागात अथवा डोंगरात जिथे नेटवर्क उपलब्ध असले त्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन रानोमाळ भटकंती करीत आहे.
महेश राऊळ, सतीश राऊळ, प्रफुल्ल राऊळ, रुपेश राऊळ, निनाद राऊळ, कुणाल मुरकर, ओंकार राऊळ, अश्विनी राऊळ, साक्षी राऊळ या ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी जेथे नेटवर्क मिळते तेथे मेहनत घेऊन एक झोपडी उभी केली आहे. महेश राऊळ यांनी या झोपडीसाठी जागा दिली आहे.
मनोरा असून नसल्यासारखा
गावात दूरसंचार कंपनीचा मनोरा असूनही नसल्यासारखा आहे. दूरसंचारच्या गलथान कारभारामुळे तो मनोरा पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. तो पूर्ववत करावा यासाठी गावाने आंदोलन करूनही तसेच आमदार, खासदार यांना निवेदने देऊनही याचा काहीही उपयोग झाला नाही. तो मनोरा बंदच आहे.
बिबट्याचे दर्शन
डोंगरावर बिबट्याचे दर्शन घडत असल्याने आॅनलाईन अभ्यासासाठी मुलांना डोंगरात पाठविणे धोकादायक बनले असल्याची चिंता आंदुर्ले विकास सोसायटीचे चेअरमन महेश राऊळ यांनी व्यक्त केली. यावेळी संतोष खानोलकर, सूरज राऊळ, चेतन राऊळ, योगेश राऊळ, अंकित गावडे, राकेश राऊळ, दीपक चव्हाण उपस्थित होते