Sindhudurg: वैभववाडीत मुसळधार पाऊस; बाजारपेठ तुंबली, भात शेतीचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:06 IST2025-10-16T12:06:23+5:302025-10-16T12:06:44+5:30
मुसळधार पावसाने अक्षरश: दाणादाण

Sindhudurg: वैभववाडीत मुसळधार पाऊस; बाजारपेठ तुंबली, भात शेतीचे मोठे नुकसान
वैभववाडी : भात कापणीला वेग आला असतानाच परतीच्या पावसाने बुधवारी (दि.१५) सायंकाळी वैभववाडी परीसराला झोडपून काढले. प्रचंड गडगडाटासह दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कापलेले भात पीक पाण्यात तरंगत होते. छत्रपती संभाजी चौक परिसर पुन्हा एकदा जलमय झाल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
वैभववाडी तालुक्यात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता होती. दुपारी साडेतीन तीनच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात गुडघाभर पाणी रस्त्यावर साचले होते.
शहरातील फोंडा–वैभववाडी रस्त्यालगत बांधलेली गटार पुन्हा एकदा निष्काम ठरली. पाण्याच्या निचऱ्यासाठी ठेवलेल्या छिद्रांवर गाळ साचल्याने संभाजी चौक परिसरात गुडघाभर पाणी साचले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा झाला असला, तरी गटार बांधणीची पद्धत आणि स्वच्छतेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुसळधार पावसाने अक्षरश: दाणादाण
ग्रामीण भागात या मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. शहरातील माईनकरवाडीसह कोकिसरे, एडगाव तसेच नावळे खोऱ्यात भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कापलेले भात पावसात भिजले, तर काही ठिकाणी पाण्यात वाहून गेले. विजांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.
आठवडा बाजाराच्या दिवशी झालेल्या या पावसामुळे फिरत्या व्यापाऱ्यांचा माल भिजून गेला. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. तर घाटमार्गातही मुसळधार पाऊस झाल्यामुळे काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली होती. मात्र, या पडझडीचा वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही.