Sindhudurg: दोडामार्गला वळवाचा तीन तास तडाखा, शेतीपिकाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:48 IST2025-05-16T14:47:21+5:302025-05-16T14:48:04+5:30
उकाड्याने हैराण जिवांना दिलासा !

Sindhudurg: दोडामार्गला वळवाचा तीन तास तडाखा, शेतीपिकाचे नुकसान
दोडामार्ग : एकीकडे वैशाख वणव्याने समस्त दोडामार्गकर होरपळून निघाले असताना गुरुवारी अचानकपणे धुवाधार कोसळलेल्या वळीवाच्या पावसाने दिलासा दिला. जवळपास तीन तासांहून अधिक काळ बरसलेल्या या वरुणराजाने व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांची धांदल उडवून दिली. उकाड्याला वैतागलेल्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून तालुक्यात कमालीचा उष्मा जाणवू लागला होता. उष्णतेचा पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला होता. वैशाख वणव्यामुळे प्राणी पक्षांपासून ते मानवजातीपर्यंत सगळेचजण होरपळून निघाले होते. सगळ्यांच्याच अंगाची लाही-लाही होत होती. त्यामुळे त्यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण थंड पण्यात डुंबून राहण्यासाठी नदीकिनाऱ्यांचा आसरा शोधत होते. अशा परिस्थितीत गुरुवारी दुपारी अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वळीवाच्या पावसाने हजेरी लावून उकाड्याने हैराण झालेल्यांना सुखद धक्का दिला.
दुपारी १ वाजता सुरू झालेला पाऊस ४ वाजता थांबला. जवळपास तीन तास पाऊस कोसळत होता. त्यामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि प्रवाशांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांच्या कोकम, मिरची, आंबा, केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले.
वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट
वळीवाच्या पहिल्याच पावसात वीजवितरणच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्यावर विजेची बत्ती गूल झाली. पाऊस थांबल्यानंतरही विजेचा लपंडाव सुरूच होता.