Sindhudurg: वैभववाडीत संततधार; करूळ घाटमार्गावर दगड, काही काळ विस्कळीत झाली होती वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:12 IST2025-09-27T14:10:28+5:302025-09-27T14:12:10+5:30
महामार्ग प्राधिकरणाने दगड हटवले

Sindhudurg: वैभववाडीत संततधार; करूळ घाटमार्गावर दगड, काही काळ विस्कळीत झाली होती वाहतूक
वैभववाडी : तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी करूळ घाटात मोठे दगड कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दगड हटवून वाहतूक सुरळीत केली.
तालुक्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले. दुपारी घाट परिसरात मुसळधार सरी कोसळल्या. याचा फटका करूळ घाटमार्गाला बसला. घाटात सायंकाळी मोठे दगड कोसळले. त्यामुळे अवजड वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. काही वाहन चालकांनी रस्त्यावरील दगड हटवून एकेरी वाहतूक सुरू केली. घाटात दगड कोसळल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोसळलेले दगड हटवून वाहतूक सुरळीत केली.
तरीही पडझड सुरूच
गणेशोत्सवानंतर करूळ घाटात मोठी दरड कोसळून घाटमार्ग ठप्प झाला होता. त्यानंतर तज्ज्ञांच्या पथकामार्फत घाटरस्त्याचे सर्वेक्षण करून मनुष्यबळ वापरून धोकादायक दरडी पाडण्याचे काम केले. त्यासाठी तब्बल ९ दिवस घाटमार्ग बंद ठेवण्यात आला होता. तरीही घाटमार्गातील पडझड थांबलेली नाही. मग या पडझडीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.