ओंकार हत्तीवरून 'सीमावाद'; वन विभागाचा अजब कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:52 IST2026-03-24T17:52:09+5:302026-03-24T17:52:40+5:30

गोवा वनपथकाची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांची अरेरावी अन् ग्रामस्थांचा संताप

Goa forest team intrudes into Maharashtra in a campaign to drive away Omkar elephants in Dodamarg taluka | ओंकार हत्तीवरून 'सीमावाद'; वन विभागाचा अजब कारभार

ओंकार हत्तीवरून 'सीमावाद'; वन विभागाचा अजब कारभार

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात 'ओंकार' हत्तीला हुसकावून लावण्याच्या मोहिमेत गोवावनविभागाचा अजब-गजब कारभार पाहायला मिळाला. चक्क महाराष्ट्र हद्दीत येऊन हत्तीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न गोवा वन विभागाने केला, तर स्थानिक वन अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने कळणे परिसरात सोमवारी मोठा तणाव निर्माण झाला होता.

ओंकार हत्ती सोमवारी पुन्हा गोवा हद्दीत शिरला असता, तेथील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांच्या टीमने हातात गुळाच्या ढेपा घेऊन त्याला चक्क फोंडियेमार्गे महाराष्ट्रात ढकलण्याचा जीवघेणा प्रकार केला. गोवा वन विभागाचे कर्मचारी कळणे परिसरात शिरल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

"दुसऱ्या राज्याच्या हद्दीत येऊन कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी?" असा जाब विचारत ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर लेखी आदेश दाखवता न आल्याने गोवा वनविभागाच्या पथकाने तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकारात दोडामार्ग वनविभागाच्या सुस्त कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुळाची ढेप अन् जीवघेणा खेळ

हत्तीला हुसकावण्यासाठी गोवा वनविभागाने चक्क गुळाचा आधार घेतला. ओंकारला गूळ खाऊ घालत त्याला गोव्यातून पुन्हा दोडामार्गच्या कळणे परिसरात आणले गेले. हा प्रकार पाहण्यासाठी बांदा राज्य मार्गावर मोठी गर्दी जमली होती. मात्र, अशा पद्धतीने वन्यप्राण्याला प्रलोभन दाखवून दुसऱ्या राज्यात ढकलणे हे नियमबाह्य असल्याचे सांगत ग्रामस्थांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला.

वरिष्ठांचा हस्तक्षेप

ग्रामस्थांच्या संतापानंतर आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर गोवा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळावरून गायब झाले. मात्र, या सीमावर्ती भागातील वन विभागाच्या नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Goa forest team intrudes into Maharashtra in a campaign to drive away Omkar elephants in Dodamarg taluka