सिंधुदुर्गच्या समुद्रात गोव्याची नौका पकडली, विनापरवाना मासेमारी करणाऱ्या खलाशांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:19 IST2026-02-12T13:19:05+5:302026-02-12T13:19:32+5:30
नौकेसह पाच खलाशांना ताब्यात घेण्यात आले

सिंधुदुर्गच्या समुद्रात गोव्याची नौका पकडली, विनापरवाना मासेमारी करणाऱ्या खलाशांची धरपकड
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे शिरकाव करून मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या ‘देवाचे बेसाव’ (DEVACHE BESSAOV) या नौकेला सीमाशुल्क प्रतिबंधक पथकाने (कस्टम्स) बुधवारी रंगेहाथ पकडले. रेडी बंदर परिसरात राबविलेल्या विशेष गस्ती मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, नौकेसह पाच खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रेडी येथील सीमाशुल्क निरीक्षक दीपक गंगाधर गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. IND-GA-01-MM-550 या क्रमांकाची ही नौका गोवा राज्यात नोंदणीकृत असून ती महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करत असल्याचे पथकाला दिसून आले. तपासणीदरम्यान नौकेवर सुमारे ५० किलो मासे आढळून आले. मात्र, नौकेकडे वैध परवाना नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
कालबाह्य परवाना नडला!
तपासणीदरम्यान नौकेवरील तांडेलकडे परवाना विचारला असता, त्याने सादर केलेला परवाना हा ‘कालबाह्य’ (एक्सपायर्ड) असल्याचे निष्पन्न झाले. नौकेवर एकूण पाच खलाशी होते. झडतीमध्ये कोणताही तस्करीचा माल किंवा संशयास्पद परदेशी नागरिक आढळले नाहीत. परवाना नसल्याने ही मासेमारी अनधिकृत ठरवत पथकाने नौका जप्त केली.
मत्स्यव्यवसाय विभागाकडे सुपुर्द
हे प्रकरण प्रामुख्याने मासेमारी नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित असल्याने, सीमाशुल्क विभागाने जप्त केलेली नौका आणि त्यातील मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे सुपुर्द केला आहे. जिल्हा सीमेवर सीमाशुल्क विभागाची कडक नजर असून, यापुढेही सागरी गस्त अधिक तीव्र केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.