शिवपुतळा मजबूत असावा, मंत्री नितेश राणे यांच्या सूचना; मालवण-राजकोट येथील पुतळा उभारणीच्या कामाचा घेतला आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 18:46 IST2025-02-07T18:44:42+5:302025-02-07T18:46:42+5:30

काम दर्जेदार करावे

From Malvan-Rajkot The work of erecting the statue of Chhatrapati Shivaji Maharaj Minister Nitesh Rane reviewed | शिवपुतळा मजबूत असावा, मंत्री नितेश राणे यांच्या सूचना; मालवण-राजकोट येथील पुतळा उभारणीच्या कामाचा घेतला आढावा 

शिवपुतळा मजबूत असावा, मंत्री नितेश राणे यांच्या सूचना; मालवण-राजकोट येथील पुतळा उभारणीच्या कामाचा घेतला आढावा 

कणकवली : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत. याविषयी मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

पुतळा उभारणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर मंत्री राणे म्हणाले, पुतळा उभारणीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुतळ्याची सर्व कामे व्यवस्थित आणि मजबूत व्हावीत यासाठी दक्ष असावे. पुतळ्याच्या रचनेचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातातील तलवार आणि तलवार धरलेला हात हवेमध्ये असणार आहे. त्यामुळे त्याच्या मजबुतीकडे विशेष लक्ष द्यावे.

त्याची ‘विंड टनेल टेस्ट’ चांगल्या प्रकारे करण्यात यावी. पुतळ्याच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच या पुतळा उभारणीच्या कामामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणा तसेच शिल्पकार, ठेकेदार, सल्लागार यांची एक विशेष बैठक पुढील आठवड्यात घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संगणकीय सादरीकरणाद्वारे पुतळ्याच्या कामाची माहिती देण्यात आली. या पुतळ्याच्या पायासाठी संपूर्णतः स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. तर, ६० फूट उंचीचा हा पुतळा संपूर्ण ब्रांझमध्ये तयार करण्यात येणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारणाऱ्या कंपनीला या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, राजकोट येथील जागेवर पायाचे काम व चबुतऱ्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली.

काम दर्जेदार करावे

यावेळी मंत्री राणे यांनी देवगड येथे उभारण्यात येत असलेल्या मत्स्य महाविद्यालयाच्या कामाचाही आढावा घेतला. त्यावेळी मत्स्य महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या तीन जागा देवगड येथे असून, महाविद्यालयाच्या अधिकारी यांनी त्या जागांचे सर्वेक्षण करून त्याविषयी सविस्तर प्रस्ताव द्यावा. हे मत्स्य महाविद्यालय दापोलीशी संलग्न असावे, महाविद्यालयाचे काम दर्जेदार करावे, तसेच पालघर येथील महाविद्यालयाच्या कामाचाही पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना दिल्या.

Web Title: From Malvan-Rajkot The work of erecting the statue of Chhatrapati Shivaji Maharaj Minister Nitesh Rane reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.