Sindhudurg: घराच्या बाजूला उगवलेली आळंबी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:11 IST2025-06-30T13:10:47+5:302025-06-30T13:11:17+5:30

या घटनेमुळे चार दिवसांपूर्वी चौकुळ येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेची आठवण झाली

Five people poisoned after eating alembics grown near their homes | Sindhudurg: घराच्या बाजूला उगवलेली आळंबी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा

Sindhudurg: घराच्या बाजूला उगवलेली आळंबी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा

सावंतवाडी : माणगाव-गोठोसवाडी येथे विषारी आळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी येथील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सुभाष पवार (३६), शीला पवार (३०), सुप्रिया पवार (८), सावन पवार (१०) आणि चंद्रशेखर स्वामी (४०) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.

घराच्या बाजूला उगवलेली आळंबी खाल्ल्यानंतर त्यांना दुपारी दोनच्या सुमारास त्रास होऊ लागला. तत्काळ त्यांना माणगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. हे सर्व जण एकाच कुटुंबातील आहेत.

गेल्यावर्षीही असेच प्रकार घडले होते. त्यानंतर आळंबी खाण्याचे प्रमाण घटले होते. या घटनेमुळे चार दिवसांपूर्वी चौकुळ येथे घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेची आठवण झाली आहे, जिथे चार व्यक्तींना विषारी आळंबीमुळे विषबाधा झाली होती.

Web Title: Five people poisoned after eating alembics grown near their homes