Sindhudurg: खाणीत पाचजण बुडू लागले, तरुणाला दिसताच पाण्यात उडी घेत चौघांना वाचविले; युवतीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:11 IST2025-11-04T13:10:16+5:302025-11-04T13:11:22+5:30
कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील घटना

Sindhudurg: खाणीत पाचजण बुडू लागले, तरुणाला दिसताच पाण्यात उडी घेत चौघांना वाचविले; युवतीचा मृत्यू
मालवण : कुंभारमाठ गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या खाणीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेले पाच जण बुडाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. यात करिश्मा सुनील पाटील (वय १६) हिचा बुडून मृत्यू झाला, तर चार जणांना वाचविण्यात यश आले आहे. यातील एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील भानुदास लोंढे यांच्याकडे दिवाळीत मुंबईहून अंजली प्रकाश गुरव (वय ३०), गौरी प्रकाश गुरव (१८), गौरव प्रकाश गुरव (२१), करिश्मा सुनील पाटील (१६), दुर्वेश रवींद्र पाटील (९) हे आले होते. हे सर्वजण सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गोवेकरवाडी लगतच्या चिरेखाणीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले होते. यात पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले. 
हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्याने तत्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य मुलांना वाचविले. मात्र, यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली. यात गंभीर बनलेल्या अंजली गुरव हिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य तीन मुले सुखरूप आहेत.
स्कुबा डायव्हिंगच्या टीमने बाहेर काढला मृतदेह
या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलिस पाटील विठ्ठल बावकर, आनंदव्हाळ पोलिस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर, मधुकर चव्हाण, विकास गोवेकर, भाई टेंबुलकर, सिद्धेश गावठे, बाबी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेषा आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमला मदतीसाठी पाठविले.
या टीमने पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला. तो विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जितेंद्र पेडणेकर यांनी पथकासह घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.