सिंधुुदुर्ग : कणकवलीत रेडीयमच्या दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:20 IST2018-05-09T12:20:16+5:302018-05-09T12:20:16+5:30
कणकवली शहरातील रेडीयमच्या दुकानाला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या आगीत रेडियमच्या दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे. त्यामुळे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कणकवली येथील शिवसेना संपर्क कार्यालया समोर असलेल्या रेडियमच्या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले.
कणकवली - शहरातील रेडीयमच्या दुकानाला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या आगीत रेडियमच्या दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे. त्यामुळे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवडाव येथील अरविंद नरे यांच्या मालकीचे भालचंद्र रेडियम या नावाचे दुकान महामार्गावरील शिवसेना संपर्क कार्यालया समोर आहे. म्हापसेकर कॉम्पलेस शेजारी त्यांनी आपल्या दुकानाचा स्टॉल उभा केला होता.
गेली काही वर्षे ते येथे गाड्यांना रेडियम लावण्याचा व्यवसाय आपल्या दोन भावांसोबत करीत आहेत. या दुकानाला अज्ञाताने आग लावली. या आगीत दुकानातील लॅपटॉप, रेडियम कटर मशीन, कॉम्प्युटर, रेडियमसह इतर लाखों रुपयांचे साहित्य आगीत जळाले.
आपल्या व्यवसायाच्या वादातूनच अनोळखी व्यक्तीने दुकानाला आग लावल्याचा प्रकार घडला असावा अशी शक्यता अरविंद नरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, हे रेडियमचे दूकान असलेल्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आग लावण्याचा हा प्रकार कैद झाला आहे. यावरून पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.