The festival begins with a procession, organized by the Vangurla Municipal Council | महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ, वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने आयोजन

महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ, वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने आयोजन

ठळक मुद्दे महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ, वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने आयोजनविद्यार्थ्यांचे लेझीम, झांजपथक लक्षवेधी

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शनिवारी सायंकाळी भव्यदिव्य शोभायात्रेने झाली. विद्यार्थ्यांची लेझीम व झांजपथके तसेच स्वच्छताविषयक विविध चित्ररथांमुळे ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली.

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२० या सर्वसमावेशक महोत्सवाला १२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. शनिवारी सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ दाभोली नाका ते नगरपरिषद स्टेडियम, कॅम्प-वेंगुर्ला या महोत्सवाच्या ठिकाणापर्यंत भव्यदिव्य शोभायात्रेने झाला. या शोभायात्रेचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण यांच्या हस्ते दाभोली नाका येथे करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक विधाता सावंत, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, शीतल आंगचेकर, पूनम जाधव, साक्षी पेडणेकर, ऋतिका कुबल, कृपा गिरप, स्नेहल खोबरेकर, दादा सोकटे, सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बाळू देसाई, प्रा. आनंद बांदेकर, माजी नगरसेवक अभी वेंगुर्लेकर, राजेश घाटवळ, शशिकांत परब, शिवसेनेच्या मंजुषा आरोलकर, सामाजिक कार्यकर्त्या सीमा नाईक आदी उपस्थित होते.

या शोभायात्रेत केपादेवी भजन मंडळ उभादांडा यांचे भजन, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे लेझीम पथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांजपथक यांच्यासह बॅ. खर्डेकर, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला हायस्कूल, मदर तेरेसा, एम. आर. देसाई, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन तसेच शहरातील वेंगुर्ला क्र. १, वेंगुर्ला क्र. २, वेंगुर्ला क्र. ३, वेंगुर्ला क्र. ४ आणि दाभोस या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. तर वेंगुर्ला क्र. २, दाभोस शाळा, वेंगुर्ला क्र. ३, एम. आर. देसाई, वेंगुर्ला क्र. ४, केंद्रशाळा वेंगुर्ला क्र. १, वेंगुर्ला हायस्कूल आणि सातेरी महिला स्वयंसहाय्यता बचतगट देऊळवाडा यांनी आपापले स्वच्छताविषयक जनजागृती करणारे चित्ररथ सादर केले.

सहभागी विद्यार्थ्यांना नगरपरिषदेने पुरविलेल्या विविध रंगांच्या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या टी-शर्टमुळे शोभायात्रा अधिकच रंगतदार झाली. वेंगुर्ल्यात आलेल्या विदेशी पर्यटकांनीही या शोभायात्रेत सहभागी होत आनंद लुटला.

या पथकांचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीच्या रा. कृ. पाटकर हायस्कूलने सर्वधर्मसमभाव या थीमवर पारंपरिक वेशभूषेसह कला सादर केली.
तर काही चित्ररथांनी कचरा स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती केली.

नृत्य-वादनाने नागरिक मंत्रमुग्ध
वेंगुर्ला शहरातून काढलेल्या शोभायात्रेत वेतोरे येथील सिंधुरत्न ढोलपथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांजपथक, विद्यानिकेतनचे लेझीम पथक यांनी विविध वाद्यांच्या तालावर सादर केलेली आकर्षक नृत्ये आणि नादमधुर वादनाने उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले.

Web Title:  The festival begins with a procession, organized by the Vangurla Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.