पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीचे सत्र सुरुच; काही गावे अंधारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:38 IST2025-05-24T17:37:29+5:302025-05-24T17:38:25+5:30
पाच तालुक्यात शंभरी पार पाऊस: नागरिकांना मोठा फटका, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडझडीचे सत्र सुरुच; काही गावे अंधारात
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पावसाचा जोर कायम होता. वारा आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र कायम असून दिवसभर मुसळधार पावसाची संततधार कायम होती. करूळ घाटात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. मात्र, त्यानंतर दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्ह्यातील ऑरेंज अलर्ट कायम असून शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात ९९.५ च्या सरासरीने ७९६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारत, गोठे, संरक्षक भिंत, दुकान आदींची पडझड होत आहे. करूळ, गगनबावडा, आंबोली या घाटात दरड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडला आहे. पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून घाट वाहतुकीस सुरळीत केले आहेत.
मुसळधार पावसामुळे काही भागात खंडित झालेली वीज अद्यापही सुरळीत झालेली नाही. त्या त्याठिकाणी महावितरणमार्फत प्रयत्न केले जात आहेत. हवामान खात्याने इशारा दिल्यानुसार जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक पाऊस
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक १६७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्या पाठोपाठ कुडाळ आणि कणकवली तालुक्यात पाऊस झाला आहे.
पाच तालुक्यात शंभरी पार पाऊस
मालवण, दोडामार्ग आणि वैभववाडी तालुका वगळता अन्य पाच तालुक्यात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे.
कणकवली - आचरा रस्ता बंद
कणकवली : कणकवली ते आचरा मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ, कुंभारवाडीमार्गे वाहनचालकांना जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.
यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील नदीवरील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता. गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. वरवडे पूल अपूर्ण असल्याने वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.