..अखेर करून दाखवलंच; पालकमंत्री आसाचो तर असो, हत्तीबाधितांमधून उमटताहेत प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:27 IST2025-04-10T18:27:15+5:302025-04-10T18:27:45+5:30

हत्ती पकड मोहिमेतून दोडामार्गवासीयांना दिलासा

Elephant capture campaign ordered Guardian Minister Nitesh Rane keeps his word | ..अखेर करून दाखवलंच; पालकमंत्री आसाचो तर असो, हत्तीबाधितांमधून उमटताहेत प्रतिक्रिया

संग्रहित छाया

वैभव साळकर

दोडामार्ग : दिनांक ८ मार्च.. वेळ रात्री आठची.. पालकमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींची सरपंचांच्या हत्तीपकड मोहिमेच्या मागणीसाठीच्या  उपोषणाला  भेट.. याचदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांचा फोन ‘...माझा शब्द आहे हत्तीपकड मोहीम राबविणार. उपोषण मागे घ्या..’ आणि त्यानंतर थांबलेले उपोषण.. हा सारा घटनाक्रम अशासाठी; कारण या सगळ्या खटाटोपाला एक महिना पूर्ण झाला नाही तोच हत्तीपकड मोहिमेचा आदेश निघाला. हत्तीबाधितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हत्तीच्या हल्ल्यात मोर्लेतील शेतकरी ठार झाला आणि लोक रस्त्यांवर उतरले. मात्र त्या परिस्थितीतही मनीष दळवी पालकमंत्र्यांशी सातत्याने संपर्कात होते आणि अवघ्या सात तासांत उच्छाद माजविणाऱ्या ओंकार नामक हत्तीला पकडण्याचा आदेश येऊन धडकला. पालकमंत्र्यांनी आपला शब्द पाळला. जे गेल्या दहा वर्षांत कोणाला जमले नाही ते पालकमंत्र्यांनी अखेर एका महिन्यात करून दाखवले. त्यामुळे हत्तीप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडून ‘पालकमंत्री आसाचो तर असो..!’ अशी बोलकी प्रतिक्रिया आपसूकच निघत आहे.

दोडामार्ग तालुक्याला गेल्या २२ वर्षांपासून हत्तींचा प्रश्न भेडसावत आहे. आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान हत्तींनी केले. शेतकरी देशोधडीला लागला. अनेकजण हत्तीच्या हल्ल्यात जायबंदी झाले; तर काहींनी आपला जीव गमावला; पण जोपर्यंत हा प्रश्न दोडामार्गपुरता सीमित होता, तोपर्यंत हत्तींना पकडण्याचे धाडस सरकार करत नव्हते; पण कालांतराने या हत्तींनी आपला प्रवास जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने सुरू केला आणि वनविभाग आणि राज्य शासन माणगाव खोऱ्याला हत्तीप्रश्नाची झळ पोहचल्यावर जागे झाले. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत तेथे हत्तीपकड मोहीम राबविली गेली; पण हत्तीची समस्या काही सुटली नाही. नव्याने पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा कळप दाखल झाला आणि पुन्हा सुरू झाला हत्ती - मानव संघर्ष..!

पालकमंत्र्यांनी शब्द खरा करून दाखविला

  • हे  आणखी किती दिवस चालणार होते ? आश्वासनांच्या गाजरांवर किती दिवस बोळवण होणार होती ? कधीतरी त्याचा उद्रेक होणार होताच आणि तो झालाही.
  • ७ मार्चला तालुक्यातील सरपंचांनी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली हत्तीपकड मोहिमेसाठी उपोषण छेडले आणि आर या पारच्या लढाईचे रणशिंग फुंकले गेले.
  • त्याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आणि दुसऱ्याच दिवशी आपला प्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना उपोषणस्थळी पाठविले.
  • ‘हत्तीपकड मोहीम राबविणार हा माझा शब्द आहे,’ असे सांगून त्यांनी उपोषण उठविले आणि महिना होण्याच्या आत हत्तीपकड मोहिमेचा दिलेला शब्दही खरा करून दाखविला.


फुकाच्या आश्वासनांमध्ये शेतकरी राजा भरडला

हत्तीचे येणे-जाणे सुरूच राहिले; पण त्यात भरडला गेला तो दोडामार्गचा शेतकरी. सुरुवातीच्या १२ वर्षांत आणि हत्तीपकड मोहिमेच्या नंतरच्या १०  वर्षांत इथल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेले हत्तीचे संकट उतरायला तयारच नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, अधिकाऱ्यांवर राजकारण्यांचा नसलेला वचक आणि मतांसाठी केला जाणारा बळिराजाचा उपयोग अशा या व्हाइट कॉलरवाल्या लोकांच्या चक्रव्यूहात इथला शेतकरी अडकला.

हत्तीबाधितांना मिळाला थोडासा दिलासा

दुर्दैवाने हत्तीच्या हल्ल्यात मोर्लेतील शेतकरी ठार झाला आणि लोकांचा उद्रेक झाला; पण त्याही परिस्थितीत त्यांनी मनीष दळवींना घटनास्थळी पाठवून परिस्थितीची माहिती करून घेतली आणि बारा तासांच्या आत पाचपैकी उपद्रव माजविणाऱ्या ओंकार नावाच्या हत्तीला जेरबंद करण्याचा आदेश काढण्यास वनविभागाला भाग पाडले.
‘जे गेल्या बारा वर्षांत कोणाला जमले नाही, ते एका महिन्याच्या आत पालकमंत्री नितेश राणे यांनी करून दाखविले,’ अशी बोलकी प्रतिक्रिया हत्तीग्रस्त शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
साहजिकच या निर्णयामुळे हत्तीबाधितांना थोडा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्र्यांनी उर्वरित चारही हत्तींना पकडून संकट कायमचे दूर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

चला सुरुवात तर झाली

ओंकार या हत्तीला पकडण्याचा आदेश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) कोल्हापूर वनसंरक्षकांना दिला आहे; त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. हत्तींना पकडण्याची सुरुवात तर झाली आहे. उर्वरित चार हत्तींनाही पकडण्याचा आदेश लवकरच निघेल, अशी आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना  काहीसा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Elephant capture campaign ordered Guardian Minister Nitesh Rane keeps his word

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.