Sindhudurg: घराजवळ पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने वृध्दा ठार, वाचवायला गेलेला नातू जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:18 IST2025-06-06T12:16:57+5:302025-06-06T12:18:14+5:30

चौकशीचे आदेश

Elderly man killed after touching fallen electric wire near house in Sakharpa Sindhudurg grandson injured while trying to save him | Sindhudurg: घराजवळ पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने वृध्दा ठार, वाचवायला गेलेला नातू जखमी

Sindhudurg: घराजवळ पडलेल्या वीज तारेच्या स्पर्शाने वृध्दा ठार, वाचवायला गेलेला नातू जखमी

साखरपा : घराजवळ पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथे घडली आहे. हृदया शांताराम मोरे (७०, रा. जाधववाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा २० वर्षांचा नातू ओम प्रकाश मोरे जखमी झाला आहे.

हृदया मोरे या गुरुवारी पहाटे घराबाहेर काम करीत असताना घराजवळ पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने त्यांना शॉक लागला. यावेळी त्यांचा नातू ओम जवळच होता. त्याने आजीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही शॉक लागला. त्यात तो जखमी झाला.

त्याचा आवाज ऐकून त्याचे वडील प्रकाश मोरे व गणेश मोरे यांनी दोघांनाही विजेच्या तारेपासून बाजूला करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तोपर्यंत हृदया मोरे यांची प्राणज्योत मालवली होती. ओमवर प्राथमिक उपचार करून त्याला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच साखरपा सरपंच रुचिता जाधव, उपसरपंच शशिकांत गुरव, ओंकार कोलते यांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व जखमी ओम मोरे याला तातडीची मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले.

चौकशीचे आदेश

या घटनेची माहिती मिळताच आमदार किरण सामंत यांनी त्याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. साखरपा पोलिस दूरक्षेत्राच्या साहाय्यक पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, कॉन्स्टेबल सुहास लाड यांनी घटनास्थळी जाऊन कार्यवाही सुरू केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Elderly man killed after touching fallen electric wire near house in Sakharpa Sindhudurg grandson injured while trying to save him