रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 13:50 IST2022-08-06T13:50:06+5:302022-08-06T13:50:32+5:30
कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र संबधित फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

रेल्वे फाटक बंद पडल्याने वाहतूक ठप्प, कणकवलीतील साकेडी येथील घटना
कणकवली: कणकवली तालुक्यातील साकेडी येथील रेल्वे फाटक बंद पडल्याने काल, शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून जवळपास दोन तासाहून अधिक काळ रेल्वे फाटक बंद राहिल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. महामार्गावरून साकेडी मार्गे नागवे, करंजे, हरकूळ आदी भागांमध्ये जाणारी वाहने या रेल्वे फाटकात दोन तासाहून अधिक काळ अडकून पडली होती.
काल, शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वे फाटकाचा वायर रोप तुटल्याने ते फाटक बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याबाबत रेल्वे तांत्रिक विभागाला गेटमन यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर नांदगाव येथून तांत्रिक कर्मचारी दाखल झाल्यानंतर तो वायर रोप पुन्हा जोडून रेल्वे फाटक पूर्ववत करण्यात आले. मात्र, या कालावधीत अनेक वाहने रेल्वे फाटकातच अडकून पडल्याने सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला.
कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र संबधित फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. हा वायर रोप तुटण्यापूर्वीच जर बदलला गेला असता तर जनतेला त्रास झाला नसता. दरम्यान, दोन तासानंतर त्या मार्गावरून थांबलेली वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तोपर्यंत कणकवलीहुन कामधंद्यावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना मात्र रेल्वे फटकातच वाहने ठेवून ताटकळत राहावे लागले होते. तर काहींना हुंबरट मार्गे असलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला होता.