देवगड तालुक्यात रिमझिम पाऊस, वातावरणाचा फटका आंबा पिकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:32 IST2019-04-30T16:30:52+5:302019-04-30T16:32:25+5:30
देवगड तालुक्यामध्ये शनिवारी रात्री रिमझिम पाऊस पडला. हा पाऊस व रविवारी दिवसभरच्या ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावरती होणार आहे.

देवगड तालुक्यात रिमझिम पाऊस, वातावरणाचा फटका आंबा पिकावर
देवगड : देवगड तालुक्यामध्ये शनिवारी रात्री रिमझिम पाऊस पडला. हा पाऊस व रविवारी दिवसभरच्या ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावरती होणार आहे.
अनेक समस्यांच्या विळख्यात आंबा बागायतदार असताना शनिवारी रात्री अचानक पडलेल्या रिमझिम अवकाळी पावसाने आणखीन एक समस्या निर्माण केली आहे. हापूस कलमांवरती हजारो रुपयांची औषधे फवारणी करून म्हणावे तेवढ्या प्रमाणात आंबा पीक आलेले नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची यावर्षी होऊ शकते अशी गंभीर परिस्थिती असताना शनिवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस व रविवारी दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर होणार आहे.
रिमझिम पावसामुळे हापूस फळांवरती काळे डाग व बुरशी पडण्याची फार मोठी शक्यता असते. आणखी असाच पाऊस दोन ते तीन दिवस पडत राहिल्यास आंबा पिकाचे फार मोठे नुकसान होणार आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व उष्णता प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण व अचानक वातावरणातील उष्णतेमध्ये वाढ झाल्यामुळे देवगड हापूस आंबा पिकावर या वातावरणाचा परिणाम होणार आहे.