सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:07 IST2026-04-12T14:06:09+5:302026-04-12T14:07:37+5:30
टेम्पोने आंबोली घाटात दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली निकिता प्रसाद राऊत ही जागीच ठार झाली.

सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
सावंतवाडी : फरशाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने आंबोली घाटात दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली निकिता प्रसाद राऊत( १० रा.फौजदारवाडी आंबोली) ही जागीच ठार झाली. तर तिची आई चैताली ही गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात पायथ्याला असलेल्या नानापाणी जवळ घडली.
अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या टेम्पो आंबोली घाटात युटर्न जवळ पलटी झाल्यामुळे तब्बल अडीच तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत टेम्पो चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी केली त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले घटनेनंतर पोलिसांकडून काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.
आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकी चालक राऊत हे आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानापाणी जवळ आले असता आंबोली गोव्याच्या दिशेने जात असलेल्या टेम्पो चालक हा मद्याच्या नशेत होता.त्याच अवस्थेत भरधाव वेगात चालला असतनाच त्याने नानापाणी जवळ राऊत याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत चिमुकली गाडीवरून खाली पडल्या मुळे ती जागीच ठार झाली. तर त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
हा प्रकार टेम्पो चालकांच्या लक्षात आल्यानंतर चालकाने सावंतवाडी च्या दिशेने पळ काढला काही किलोमीटर गेल्या नंतर चालकाचा गाडीवर ताबा सुटल्यामुळे ट्रक यु आकाराच्या वळणा वर रस्त्याच्या मधोमध पलटी झाली तर फरशाही रस्त्यावर कोसळल्या त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली होती.
अपघातानंतर लागलीच निकिताचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणण्यात आला घटनेची माहिती मिळाल्यानंतर आंबोलीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली तसेच चालक व क्लीनरच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आमच्या चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्या या दोघांना ताब्यात द्या अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली यावेळी पोलीस हवालदार रामदास जाधव व संतोष गलोले यांनी योग्यरीत्या परिस्थिती हाताळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळावर धाव घेतली ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती त्याच वेळी तेथे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आणि नगरसेवक देवा टेमकर यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला तसेच जखमींना ग्रामस्थांनी मोठी मदत केली.