दोडामार्गचे गोव्यात विलिनीकरण व्हॉट्सअॅप ग्रुप वादात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:27 IST2019-11-15T11:25:33+5:302019-11-15T11:27:25+5:30
दोडामार्ग : तालुक्याचे गोव्यात विलिनीकरण करा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले व्हॉट्सअप ग्रुप वादात सापडले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून ...

शिवसेना नेत्यांची बदनामी केल्याप्रकारी व्हॉट्सअॅप ग्रुपवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून दोडामार्ग पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी गणेशप्रसाद गवस, अण्णा केसरकर, बाबुराव धुरी, संजना कोरगावकर आदी उपस्थित होते.
दोडामार्ग : तालुक्याचे गोव्यात विलिनीकरण करा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले व्हॉट्सअप ग्रुप वादात सापडले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून शिवसेना नेत्यांची बदनामी करण्यात आली, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी येथे केला आहे. तसेच हा प्रकार करणाऱ्या संबंधितांसह ग्रुप अॅडमिनवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी दोडामार्ग पोलिसांकडे केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांना निवेदन देण्यात आले आहे. दोडामार्गचे गोव्यात विलिनीकरण करण्यात यावे याबाबत जनजागृती करण्यासाठी काही लोकांनी व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या नेत्यांवर अत्यंत हीन दर्जाची टीका केली जात आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सेना उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, दोडामार्ग सभापती संजना कोरगावकर, महिला उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस, युवासेना उपप्रमुख भगवान गवस, मदन राणे, उपविभाग प्रमुख मिलिंद नाईक, श्रेयाली गवस, संदीप कोरगावकर, बबलू पांगम, दौलत राणे यांच्यासह असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.