Sindhudurg: अर्थसंकल्पात १५८ कोटींच्या विकासकामांना मान्यता; देवबाग समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:48 IST2025-03-11T17:45:27+5:302025-03-11T17:48:30+5:30
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या ...

Sindhudurg: अर्थसंकल्पात १५८ कोटींच्या विकासकामांना मान्यता; देवबाग समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण होणार
मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे.
तारकर्ली, देवबाग येथे वाहतूक कोंडी टाकण्यासाठी समुद्र आणि खाडीच्या बाजूने बंधारा कम रस्ता व्हावा, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या बंधारा कम रस्त्यामुळे किनारपट्टीची धूप रोखणे आणि सागरी अतिक्रमणापासून संरक्षण मिळण्याबरोबरच पर्यटन वाढीसाठीही मोठा फायदा होणार आहे.
यामध्ये देवबाग, तळाशील येथे किनारपट्टीची धूप थांबविण्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवर अद्यावत ग्रोयन्स पद्धतीचे बंधारे उभारणे, देवबागमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाडी किनारी बंधाराकम रस्ता करून घेणे, पर्यटनाच्या दृष्टीने मालवण जेटी ते दांडी किनारपट्टीवर मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर सुशोभीकरण करून बंधारा काम रस्ता तयार करणे आदी बाबींचा समावेश होता. यंदाच्या अर्थसंकल्पात मालवण किनारपट्टीवरील तब्बल १५८ कोटी रुपयांच्या विकासकांना मान्यता देण्यात आल्यामुळे आमदार नीलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले जात आहेत.
आमदार नीलेश राणे यांची होती मागणी
स्थानिक आमदार नीलेश राणे यांनी मालवणच्या किनारपट्टी भागाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालताना मुंबई येथे महाराष्ट्र सागरी मंडळच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत किनारपट्टीवरील महत्त्वाकांक्षी योजनांची संकल्पना मांडली होती.
न्याय देणारा अर्थसंकल्प : राणे
माझ्या मतदारसंघातील देवबाग किनारपट्टीवरील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता देण्याच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
‘लोकमत’ने उठविला वेळोवेळी आवाज
देवबागमधील वाहतूक कोंडी, सागरी अतिक्रमण, किनारपट्टीची धूप आदी प्रश्नांवर ‘लोकमत’मधून सातत्याने आवाज उठविण्यात आला होता. तारकर्ली देवबागमध्ये खाडी आणि समुद्राच्या बाजूने रिंग रोड झाल्यास तारकर्ली, देवबाग गावांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. सागरी अतिक्रमणाबरोबरच वाहतूक आणि पर्यटनातील अडथळ्यांमधून नागरिकांची सुटका होईल याकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.