किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:10 IST2024-12-23T16:09:39+5:302024-12-23T16:10:03+5:30

''त्याची 'त्यांना' आठवण करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर''

Development will be achieved along with coastal protection Minister Nitesh Rane expressed his opinion | किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं मत

किनारपट्टीच्या संरक्षणाबरोबर विकास साधणार, मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं मत

कणकवली : सिंधुदुर्गसह कोकणचा विकास सर्वांना एकत्रित घेवून करायचा आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी  मत्स्य तसेच बंदर ही दोन्ही खाती यापूर्वी सांभाळली आहेत. त्यांच्या तसेच माझ्या अन्य सहकारी आजी व माजी आमदारांच्या अनुभवावर मोठे काम करून दाखवायचे आहे. हे खातं सांगाळताना किनारपट्टीचे संरक्षण तसेच विकास याचाही विचार करायचा आहे. येथील दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे, असे सूतोवाच मत्स्य व बंदर  विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

खारेपाटण येथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले,
नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा प्रवास मत्स्य खात्यातून सुरू झाला होता. त्यांनी बंदर खातं पण सांगाळलं होतं. आमच्यासोबत असलेले रविंद्र चव्हाण यांनाही चांगला अनुभव आहे. दीपक केसरकरही आहेत, आमदार नीलेश राणे, माजी आमदार गोगटे माझ्यासोबत आहेत. या सर्वांचा बलाढ्य अनुभव माझ्याकडे आहे. त्या अनुभवावर जनतेचा  विकास साधायचा आहे.

पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हा माझा प्रश्न नाही, वरिष्ठ देणार ती जबाबदारी मला पार पाडायची आहे. कोकणातील आंबा, काजू, सुपारी, मासे यावर मोठे अर्थकारण अवलंबून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बारकाईने विचार करून मला या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे.  कुठल्याही पद्धतीचा सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून कोकण किनारपट्टीवर हल्ला होऊ नये, याची काळजी घ्यायची आहे.

२६/११ चा हल्ला समुद्राच्या माध्यमातून झाला होता. असे काही राष्ट्रविरोधी विचाराचे लोक राहतात, त्यांच्यावर बारकाईने लक्ष राहील. सागरी सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. किनारपट्टीवरील सीआरझेड, अतिक्रमणे आहेत, ती धोक्याची ठरू शकतात. गेल्याच महिन्यात रत्नागिरीत अतिरेकी संघटनेशी निगडीत काहीजणाना अटक झाली. ते किनारपट्टीवर राहत होते. अशांवर बारीक नजर राहणार आहे. 

स्थलांतरीत तरुण रोजगारासाठी थांबला पाहिजे, असे काम इथे करायचाय

कोकणातील तरुण वसई, विरार, नालासोपारा आदी भागात रोजगारासाठी जात होता. हा स्थलांतरीत होणारा तरुण येथेच रोजगारासाठी थांबला पाहिजे, असे काम इथे करायचे आहे. देवगडचा आमदार कधी मंत्री होत नाही. तो नेहमी विरोधी पक्षात बसणार, असा आरोप, टीका केली जात असे. मात्र,आता माझ्या रुपाने एक उदाहरण मिळाले आहे. यापुढे कधीही असा ठपका ठेवला जाणार नाही. 

'राणे संपले' म्हणाऱ्यांना उत्तर मिळाले 

'राणे संपले' अशी टीका करणाऱ्या विरोधकांना आता त्याचे उत्तर मिळाले असेल. विरोधकांनी दहा वर्षे मला खूप अनुभव दिले आहेत. ते सत्तेत असताना विरोधक म्हणून माझ्याशी कसे वागले, त्याची त्यांना आठवण करून देण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. आज माझ्या होणाऱ्या स्वागताचा क्षण कार्यकर्त्यांमुळे अनुभवायला मिळाला. कार्यकर्ते सोबत राहिले. त्यामुळे त्यांचा हट्ट पुरवणं हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या मनाप्रमाणे स्वागत स्वीकारत आहे. असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Development will be achieved along with coastal protection Minister Nitesh Rane expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.