गायीला वाचवताना मालगाडीच्या धड़केने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 14:35 IST2017-11-01T14:30:33+5:302017-11-01T14:35:31+5:30
रेल्वे ट्रॅकवरील गायीला वाचवताना मालगाडीचा धक्का बसून वाघेरी येथील विनोद लाड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

गायीला वाचवताना मालगाडीच्या धड़केने शेतकऱ्याचा मृत्यू
कणकवली : रेल्वे ट्रॅकवरील गायीला वाचवताना मालगाडीचा धक्का बसून वाघेरी येथील विनोद लाड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
कणकवली तालुक्यातील वाघेरी कुळ्याचीवाडी येथील विनोद सोनू लाड ( 58 ) बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या गुरांना चरण्यासाठी घेवून रेल्वे ट्रॅक परिसरात गेले होते. यावेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी मालगाडी येत असतानाच लाड यांची गाय रेल्वे ट्रॅकवरच पोहचली होती.
या गायीला रेल्वे ट्रॅक वरुन बाजूला घेत असतानाच मालगाडीचा पाठीमागून धक्का लागून विनोद लाड जागीच गतप्राण झाले. तर गायीचाही मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
विनोद लाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व २ मुली असा परिवार आहे. लाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून वाघेरी गावावर शोककळा पसरली आहे.