शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाने फेरले पाणी; सिंधुदुर्गात १२७०.६१ हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:29 IST2025-11-01T16:28:45+5:302025-11-01T16:29:06+5:30
कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवणात सर्वाधिक नुकसान

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाने फेरले पाणी; सिंधुदुर्गात १२७०.६१ हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त
ओरोस : सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांवर आणि आशांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. कापणीसाठी तयार असलेले भात आणि नाचणीचे पीक पावसामुळे भिजून वाया गेले आहे. कर्ज, खर्च आणि कष्ट या त्रिसूत्रीमध्ये अडकलेला शेतकरी आता पूर्णपणे हवालदिल झाला आहे. २१ ते ३० ऑक्टोबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे २८१ गावांतील तब्बल ५ हजार ८२७ शेतकऱ्यांचे १२७०.६१ हेक्टर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त झाले आहे.
जिल्ह्यात ५४ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. भात कापणी सुरू झाल्यानंतर सुरू झालेल्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. सतत पडणारा पाऊस आणि ओलाव्यामुळे भात पीक खराब होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचे संकट कायम असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवणात सर्वाधिक नुकसान
मे मध्ये पावसाची सुरुवात, जुलैतील ओढाताण आणि ऑक्टोबरअखेर पुन्हा संकट या उलटसुलट हंगामाने शेतकऱ्यांच्या कष्टांची थट्टाच केली आहे. एकीकडे खतांचा, मजुरांचा खर्च आणि दुसरीकडे पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार कुडाळ, सावंतवाडी, देवगड आणि मालवण तालुक्यांतील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
नुकसानीची माहिती द्यावी
दरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पंचनाम्यासाठी शेतीच्या नुकसानीची माहिती कृषी सहायक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांना त्वरित द्यावी, जेणेकरून शासन मदतीचा लाभ लवकर मिळू शकेल.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल (२१ ते ३० ऑक्टोबर)
| तालुका | बाधित गावे | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) |
| देवगड | १८ | १७८ | १३.०३ |
| मालवण | ५८ | १६९२ | ३५२.८२ |
| सावंतवाडी | ६१ | १८६३ | ५१०.६८ |
| दोडामार्ग | १० | १०७ | १६.३१ |
| वेंगुर्ला | २६ | १७३ | ७.२७ |
| कणकवली | २९ | १५५ | ३५.०० |
| कुडाळ | ७१ | १६०४ | ३३२.८५ |
| वैभववाडी | ८ | ५५ | २.६५ |
| एकूण | २८१ | ५८२७ | ११७०.६१ |