corona virus : एसटीमध्ये फक्त २२ प्रवाशीच बसवा,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:39 IST2020-08-22T16:33:03+5:302020-08-22T16:39:25+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीमध्ये २२ प्रवाशीच बसवावेत, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली.

कणकवली येथे एसटीचे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी परशुराम उपरकर, राजन दाभोलकर आदी उपस्थित होते.
कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीमध्ये २२ प्रवाशीच बसवावेत अशा शासनाच्या सूचना आहेत. मात्र, गावपातळीवर जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये ३० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशीही काही वेळा बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अशावेळी जादा गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी एसटीचेसिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली.
परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची विभागीय कार्यालयात भेट घेतली. तसेच एसटी बाबतच्या समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपरकर यांच्या समवेत मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, विनोद बिर्जे, निखील आचरेकर, संतोष कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काही गावांमध्ये जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. अशावेळी दुसरी गाडी सोडण्यात यावी. २२ प्रवाशांच्यावर प्रवासी बसमध्ये बसवू नयेत. सोशल डिस्टसिंगच्यादृष्टीने हे महत्वाचे असल्याकडे उपरकर यांनी विभाग नियंत्रकाचे लक्ष वेधले.
याबाबतच्या काही तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचेही सांगितले. दरम्यान, आपण सर्व एसटी आगार व्यवस्थापकांना याबाबत सूचना देतो. २२ पेक्षा जास्त प्रवाशी असल्यास दुसरी गाडी सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.