प्रेमविवाह केल्याच्या वादातून मारहाण परस्परविरोधी तक्रारी

By Admin | Updated: May 24, 2014 01:04 IST2014-05-24T01:04:00+5:302014-05-24T01:04:52+5:30

३१ जणांविरोधात गुन्हे दाखल

Controversial complaint against the marriage of love marriage | प्रेमविवाह केल्याच्या वादातून मारहाण परस्परविरोधी तक्रारी

प्रेमविवाह केल्याच्या वादातून मारहाण परस्परविरोधी तक्रारी

देवगड : रहाटेश्वर दादरावाडी येथील युवकाने कुंभारवाडी येथील युवतीशी प्रेमविवाह केल्याने व्यथित झालेल्या मुलीकडील नातेवाइकांनी वादविवाद केला. त्यातून मारहाणीचा प्रसंगी उद्भवला. याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या तक्रारींनुसार ३१ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. रहाटेश्वर दादरावाडी येथील शिवाजी अण्णा झोरे या २४ वर्षीय युवकाने कुंभारवाडी येथील सरिता तुकाराम फाले या युवतीशी प्रेमविवाह केला होता. यावरून दोन्ही कुटुंबांत वाद झाला. शिवाजी झोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फाले, कोकरे, लांबोरे कुटुंबांतील २३ जणांनी एकत्र जमून आपल्याला मारहाण केली. क्वालिस गाडीची मोडतोड केली. झटापटीत पाऊण तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाली व मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. ही घटना आज, शुक्रवारी रात्री एक वाजता घडली होती. याप्रकरणी संजय कोकरे, महेश फाले वगैरे २३ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसर्‍या बाजूने संजय रामचंद्र कोकरे (रा. रहाटेश्वर कुंभारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दीपक झोरे, संतोष झोरे, आदी आठजणांनी कुंभारवाडी येथे जाऊन मारहाण करून युनिकॉर्न मोटारसायकल व ट्रकची तोडफोड केली. महेश फाले याची १९ ग्रॅमची सोन्याची चेन गहाळ झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे देवगड पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींनुसार फाले, कोकरे, लांबोरे कुटुंबांतील २३ जणांवर; तर दीपक झोरे, संतोष झोरे यांच्यासह आठजणांवर अशा एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास देवगडचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Controversial complaint against the marriage of love marriage