Congress party has no right to remove whip: Narayan Rane | जिल्हा परिषद : काँग्रेसला व्हिप काढण्याचा अधिकार नाही : नारायण राणे
कणकवली येथे जिल्हापरिषद सदस्य गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल रणजित देसाई यांचे अभिनंदन खासदार नारायण राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी अतुल काळसेकर, संजना सावंत, संदीप कुडतरकर, राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, रेश्मा सावंत, संजू परब, संदेश सावंत, मनिष दळवी आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देकाँग्रेस पक्षाला व्हिप काढण्याचा अधिकार नाही : नारायण राणेजिल्हा परिषदच्या गटनेतेपदी रणजित देसाई ; कणकवलीत बैठक

कणकवली : सिंधुदुर्गजिल्हा परिषदमधील आमच्या सदस्यांचा गट तयार करण्यात आला होता. त्या गटाच्या नेत्याने राजीनामा दिल्याने नव्याने जिल्हा परिषदच्या गटनेतेपदी रणजित देसाई यांची निवड करण्यात आली आहे. ज्यावेळी गट स्थापन होतो त्यावेळी गटनेत्याला व्हिप बजावण्याचा अधिकार असतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद सदस्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार नाही. येत्या आठ दिवसात जिल्हा परिषद सदस्यांचा गट तांत्रिक दृष्ट्या पुर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविणार असल्याचे सूतोवाच भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी येथे केले.

कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीनंतर खासदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप प्रदेश प्रतिनिधी अतुल काळसेकर, जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, संदीप कुडतरकर, राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, माजी जि़ल्हापरिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सर्व विषय समितींचे सभापती, संजू परब, संदेश उर्फ गोट्या सावंत, मनिष दळवी यांच्यासह जिल्ह्यातील २१ राणे समर्थक जिल्हा परिषद सदस्य व भाजपाचे सहा जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे आमचे सर्व सदस्य व भाजपा सदस्यांची बैठक आयोजित केली होती. यापूर्वी आमच्या सर्व सदस्यांचा गट तयार करण्यात आला होता. गटनेता पक्ष सोडून गेल्यामुळे नवीन गटनेता या बैठकीत निवडण्यात आला. रणजित देसाई हे गटनेते म्हणून काम करणार आहेत. त्यांचे नाव जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सुचविले. येत्या आठ दिवसात गटाची तांत्रीकदृष्ट्या कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. त्यानंतर येत्या आठवड्याभरात पक्षांतराची प्रक्रीया पुर्ण होईल. भारतीय जनता पार्टीत लवकरच प्रवेश या आमच्या सर्व सदस्यांचा होणार आहे.

काँग्रेस पक्ष हा फार जुना आहे. पण कायदेशिर सल्ला न घेताच त्यांच्याकडून व्हिप काढला गेला. त्याचा फरक जिल्हा परिषद सदस्यांना पडत नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्षाना व्हीप काढण्याबाबतचा कोणताही अधिकारी नाही. असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला.

जिल्हा परिषदवर भाजपाचे कमळ फुलणार ?

विधानसभा निवडणुकीच्या अनुषणगाणे सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्यत्व व गटनेते पदाचा राजीनामा दिला. तसेच राजलक्ष्मी डिचवलकर, संजय आग्रे, स्वरूपा विखाळे या तीन काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी या बैठकीला अनुपस्थिती दर्शविली.

त्याचबरोबर जि़ल्हा परिषद सदस्य बाळा जठार व संतोष साटविलकर यांनी वैयक्तिक कारणास्तव बैठकीत सहभाग घेतला नसल्याचे समजते. राणे समर्थक २६ सदस्यांपैकी तिघांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र , राणे समर्थक जि़ल्हा परिषद सदस्य २३ आणि भाजपाचे सहा जि़ल्हा परिषद सदस्य असे मिळून संख्याबळ २९ वर पोहोचले आहे. त्यामुळे लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपाचे कमळ फुलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 

Web Title: Congress party has no right to remove whip: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.