आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, मुंबई येथे मंत्री नितेश राणे यांची कृषी मंत्र्यांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:34 IST2025-02-12T16:33:19+5:302025-02-12T16:34:08+5:30
कणकवली : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. ...

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत, मुंबई येथे मंत्री नितेश राणे यांची कृषी मंत्र्यांसोबत बैठक
कणकवली : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. फुलकीड नियंत्रणाबाबत मुंबई येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
फुलकिडीमुळे होत असलेल्या नुकसानीविषयी परिस्थिती कृषी मंत्री कोकाटे यांच्या निदर्शनास आणून मंत्री राणे म्हणाले की, या किडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध कीटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही कीड नियंत्रणात आलेली नाही. ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहायक यांच्यासाठी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करावे.
मंत्री राणे यांच्या या सूचनांना कृषी मंत्री कोकाटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे आदेश डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास दिले आहेत. तसेच याविषयी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.