यंदा राज्याच्या श्री शिवछत्रपती पुरस्कारातून कॅरमला वगळले, संघटनेने व्यक्त केली तीव्र नाराजी

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 3, 2024 04:11 PM2024-01-03T16:11:17+5:302024-01-03T16:11:43+5:30

देशाच्या क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणाऱ्या खेळाला वगळल्याबद्दल तीव्र नाराजी

Caram was excluded from the state Shri Shiv Chhatrapati Award this year | यंदा राज्याच्या श्री शिवछत्रपती पुरस्कारातून कॅरमला वगळले, संघटनेने व्यक्त केली तीव्र नाराजी

यंदा राज्याच्या श्री शिवछत्रपती पुरस्कारातून कॅरमला वगळले, संघटनेने व्यक्त केली तीव्र नाराजी

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या मराठमोळ्या खेळाडूंची पराक्रमी कामगिरी असणाऱ्या कॅरम या लोकप्रिय खेळाला राज्याच्या प्रतिष्ठेच्या श्री शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीतून वगळल्याबद्दल राज्यातील कॅरमपटू आणि राज्य कॅरम संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या कॅरमने देशाला ३ विश्वविजेते, ३० आंतरराष्ट्रीय कॅरम विजेते आणि १२ पुरुष व महिला विजेते मिळवून दिले आहेत. असे असतानाही महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याने कॅरमला पुरस्कारांच्या यादीतून वगळून या राज्याच्या खेळावर मोठा अन्याय केल्याची भावना राज्यातील कॅरमपटू आणि कॅरम संघटक व्यक्त करीत आहेत. या अन्यायाविरोधात आपण राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या भावना कळवणार असल्याचे महाराष्ट्र कॅरम संघटनेचे मानद सचिव आणि आंतरराष्ट्रीय कॅरमपटू, संघटक अरुण केदार यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या श्री शिवछत्रपती पुरस्कारासाठीच्या यादीत कॅरम, शरीरसौष्ठव, बिलियर्डस, स्नूकर, घोडेस्वारी आणि पॉवरलिफ्ट या महत्त्वाच्या खेळांना स्थान न दिल्याने राज्याला नावलौकिक मिळवून देणाऱ्या या खेळातील खेळाडू आणि क्रीडा संघटक प्रचंड नाराज आहेत. राज्याच्या क्रीडा मंत्रालयाने या महत्त्वपूर्ण खेळांना प्रतिष्ठेच्या श्री शिवछत्रपती पुरस्कार यादीत स्थान द्यावे, असे कळकळीचे साकडे राज्याचे कॅरमपटू, पॉवरलिफ्ट खेळाडू, शरीरसौष्ठवपटू आणि बिलिअर्डस खेळाडूंनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि खेळप्रेमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे.

राज्याची कीर्ती वाढवणाऱ्या कॅरमपटूंवर अन्याय का?

राज्याच्या कॅरमपटूंनीं महाराष्ट्राची कीर्ती केवळ देशातच नव्हे जगात वाढवली आहे. असे असताना या खेळाडूंना राज्याचा प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार मिळू नये हे मनाला दुःख देणारे आहे. विद्यमान विश्वविजेता कॅरमपटू संदीप दिवे, जागतिक तृतीय मानांकित महिला कॅरमपटू नीलम घोडके आणि युवा आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकर या महाराष्ट्राच्या पराक्रमी कॅरमपटूंना यंदाच्या पुरस्काराची संधी होती. जर कॅरम हा खेळच यंदाच्या शिवछत्रपती पुरस्कार यादीतून वगळला तर या गुणी कॅरमपटूंवर अन्याय होईल अशी खंत आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आणि संघटक प्रशिक्षक अरुण केदार यांनी बोलून दाखवली आहे.

Web Title: Caram was excluded from the state Shri Shiv Chhatrapati Award this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.