Sindhudurg: तिलारी कालव्यात कार कोसळली, महिलेचा मृत्यू; मुलासोबत लक्ष्मीपूजनासाठी घरी परतताना काळाचा घाला
By सुधीर राणे | Updated: December 19, 2024 12:48 IST2024-12-19T12:47:03+5:302024-12-19T12:48:15+5:30
वैभव साळकर दोडामार्ग : कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी ...

Sindhudurg: तिलारी कालव्यात कार कोसळली, महिलेचा मृत्यू; मुलासोबत लक्ष्मीपूजनासाठी घरी परतताना काळाचा घाला
वैभव साळकर
दोडामार्ग : कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीसोबत आपल्या लहान मुलाला ठेवून गुरुवारी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी परतणाऱ्या पत्नीवर बुधवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. मोठ्या मुलासोबत कारने येत असताना कारवरील नियंत्रण सुटून ती तिलारी कालव्यात कोसळून अपघात झाला. अपघातात शुभांगी शिवा परब (वय ५५) यांचा मृत्यू झाला. तर सचिन शिवा परब (रा. ओझरी, ता. पेडणे, गोवा) जखमी झाला. साटेली भेडशी भोमवाडी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
शुभांगी परब यांचे पती शिवा परब हे गोवा येथील शिक्षण विभागात कार्यरत होते. अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते. तर त्यांचा मोठा मुलगा सचिन परब हा गोव्यातील पोलीस खात्यात कार्यरत आहे. वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करावी व मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असल्याने लक्ष्मीपूजन करण्यासाठी आईला घरी आणावे यासाठी सचिन हा आपल्या लहान भावाला घेऊन कारने बुधवारी कोल्हापूरला गेला.
त्यानंतर सायंकाळी शुभांगी यांनी आपल्या लहान मुलाला पतीसोबत ठेवून मोठ्या मुलासह घरी येण्यास निघाल्या. मात्र सायंकाळची वेळ असल्याने त्यांनी रात्री कुडासे वानोशी येथे आपल्या माहेरी मुक्काम करण्याचे ठरविले. त्या दिशेने जात असता साटेली- भेडशी येथील भोमवाडी मुख्य रस्त्यावरील कालव्याजवळ त्यांची गाडी आली असता सचिनचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात कोसळली.
स्वत:सह आईलाही कारमधून बाहेर काढले, पण..
कालव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने गाडी वाहून जाऊ लागली. सचिन धिटाईने गाडीतून बाहेर पडला व आईलाही गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर लगतच्या घरातील लोकांना मदतीसाठी बोलविले. सचिनने स्थानिकांच्या मदतीने आईला तत्काळ लगतच्या साटेली -भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र शुभांगी परब यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला
अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. शिवाय सर्व हकीकत सांगून तिलारी कालव्यातील पाणी बंद करण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी देखील वेळ न दवडता कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद केला. मात्र अपघातामुळे गाडी तब्बल ५० मीटर अंतरापर्यंत वाहून गेली होती. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांचे जाबजबाब नोंदवून पंचनामा केला.