कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे मुंबई - गोवा महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी अनोळखी मृतदेह सापडला होता. त्याची ओळख पटवण्याचे काम कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते. दिवसभराच्या तपासाअंती तो मृतदेह श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बंगळुरू, कर्नाटक) यांचा असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. मात्र, याविषयी सखोल तपास सुरू असल्याचे कारण सांगत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.साळीस्ते येथे मृतदेह मिळाल्याची ही घटना गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. त्या परिसरात गेलेल्या वाटसरूला काही तरी कुजल्याचा वास आला होता. त्याने शोध घेतला असता, मृतदेह दिसला होता. त्याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली.साळीस्ते येथे मृतदेह आढळलेल्या त्या व्यक्तीचे डोके, छातीचा भाग काहीसा कुजला होता. शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राचे वार होते. त्या मृताची ओळख पटू नये, यासाठी मारेकऱ्यांनी मृतदेहाचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्नही केला होता.मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली. यामध्ये हा मृतदेह बंगळुरू येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी गुप्त माहितीगाराद्वारे बंगळुरू येथील दोन व्यक्तींशी संपर्क साधला. या दोन्ही व्यक्ती गुरुवारी दुपारच्या सुमारास कणकवलीत दाखल झाल्या होत्या. पाहणीअंती हा मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे त्या दोन्ही व्यक्तींनी स्पष्ट केले.
मात्र, या दोन्ही व्यक्ती मृताच्या नातेवाईक नाहीत. त्या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत? याविषयीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. सद्यस्थितीत जे नाव समजले आहे त्या ‘श्रीनिवास रेड्डी’ यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले आहे. हे पथक श्रीनिवास रेड्डी यांच्या कुटुंबीयांना घेऊन कणकवलीत परतणार आहे. त्यानंतरच हा मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा आहे की नाही, हे अधिकृतरित्या स्पष्ट होईल, असे कणकवलीचे पोलिस निरीक्षक तेजस नलावडे यांनी सांगितले.
येत्या एक ते दोन दिवसांमध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव निश्चित होईल, असे कणकवली पोलिस सांगत आहेत. मात्र, नाव निश्चित झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या खुन्याला शोधण्याचे आव्हान कणकवली पोलिसांसमोर असणार आहे. दरम्यान, दोडामार्ग येथे रक्ताने माखलेली एक कार सापडली होती. त्या कारचा साळीस्ते येथे आढळलेल्या मृतदेहाशी संबंध आहे की नाही, याविषयीही पोलिस कसून तपास करत आहेत. मात्र, तपासात अडथळा येण्याचे कारण सांगत त्याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
Web Summary : A body found near Saliste, identified as Srinivas Reddy from Bengaluru, had been murdered. Police are investigating, with a team sent to Bengaluru to confirm the identity and investigate links to a car found in Dodamarg.
Web Summary : सालिस्ते के पास मिला शव बेंगलुरु के श्रीनिवास रेड्डी का है, जिनकी हत्या कर दी गई थी। पुलिस जांच कर रही है, एक टीम पहचान की पुष्टि करने और दोडामार्ग में मिली कार से संबंधों की जांच करने के लिए बेंगलुरु भेजी गई है।