Sindhudurg: शेतकऱ्यांचा मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम; कुडाळजवळ टायर पेटवले, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:39 IST2026-03-23T11:37:46+5:302026-03-23T11:39:59+5:30
शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती

Sindhudurg: शेतकऱ्यांचा मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम; कुडाळजवळ टायर पेटवले, वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्ग: आंबा व काजू उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी आज, सोमवारी मुंबई -गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींसह हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, काही आक्रमक शेतकऱ्यांनी महामार्गावर कुडाळजवळ टायर पेटवून निदर्शने केली.
नांदगाव येथील पेट्रोल पंपासमोर हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील बागायतदार मोठा संख्येने एकवटले आहेत. बागायतदारांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी घोषणाबाजी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. तर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. आंदोलनात माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सुशांत नाईक आदी नेते उपस्थित आहेत.
अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतदारांना नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी १० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास महामार्गावर चक्कजाम करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.
शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच याची अधिकृत घोषणा केली जाईल, असेही सांगितले होते. मात्र सरकारने यावर ठोस निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम केला आहे.
वाहतूक विस्कळीत, पोलिस घटनास्थळी दाखल
कुडाळजवळील पावशी-घावनळे फाट्याजवळ अज्ञातांनी महामार्गावर टायर पेटवले. यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. टायर पेटवण्याचा हा प्रकार बागायतदारांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे की यामागे आणखी काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कार्यवाही सुरू केली असून, यामागे नेमके कोण याचा पोलिस शोध घेत आहेत.