Sindhudurg: दीपक केसरकरांवर भाजपचा उसना गुलाल, नगरपरिषदेतील निकालानंतर विशाल परब यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:19 IST2025-12-22T16:18:07+5:302025-12-22T16:19:11+5:30
स्वतंत्र लढल्यावर काय होत हे नगरपरिषद निवडणुकीत दिसले

Sindhudurg: दीपक केसरकरांवर भाजपचा उसना गुलाल, नगरपरिषदेतील निकालानंतर विशाल परब यांची टीका
सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीत माझी चूक झाली हे मला मान्य आहे. मात्र भाजपाने सहकार्य केले नसते तर या ठिकाणी दीपक केसरकर आमदार दिसले नसते, त्यांनी विधानसभेला भाजपचा उसना गुलाल उधळला. मात्र स्वतंत्र लढल्यावर काय होत हे नगरपरिषद निवडणुकीत दिसले. त्यामुळे आता तरूणांना संधी द्या. सगळ्याची आशा करू नका, तुम्ही वीस वर्षांत मतदारसंघात काय नवीन आणल याचे पहिले उत्तर द्या अशी जोरदार टीका भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी केली.
दरम्यान संजू परब यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही. उद्या ते माझ्या बाजूला बसलेले दिसतील. यात काही शंका नाही. त्यांची टीका मी मस्करीवर घेतो. त्यामुळे अधिक काही बोलणार नाही असे ही ते म्हणाले. परब हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, अमित परब, हितेन नाईक, केतन आजगावकर उपस्थित होते.
परब म्हणाले, आम्ही दीपक केसरकर यांच्या विरोधात नाही. त्याच्या हाताला धरुन आपण पुढील काम करणार आहे, असे सांगत आता त्यांनी वडीलधारी बनून सल्ला देण्याचे काम करावे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. गेल्या वीस वर्षात त्यांना येथील जनतेने निवडून दिले मात्र तरुणांच्या हाताला रोजगार देणे गरजेचे होते. पण रोजगार देऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. असे सांगत आता त्यांनी थांबणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.
संजू परबांची संजय राऊतांसारखी परिस्थिती
संजू परबांच्या टिकेला प्रत्यूत्तर देताना ते म्हणाले, त्यांची टीका मी मनावर घेत नाही. जसे संजय राऊत बोलतात आणि त्यांची टीका कोणी मनावर घेत नाही, तशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांची टीका म्हणजे लोकांना मस्करी वाटते. उद्या ते माझ्या बाजूला बसलेले असले तर नवल वाटायाला नको, असा चिमटाही काढला.
माझ्यामुळे काही जण आमदार, खासदार झाले
आमदार निलेश राणे आणि नारायण राणेंकडून झालेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी मी कोणावर टीका करणार नाही परंतू त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केले आहे. आणि करत आहे. माझ्यामुळे काही जण आमदार, खासदार झाले. माझी ४० हजाराच्यावर मते आहेत हे कोणी विसरु नये, असे असा ही टोला त्यांनी कोणाचे नाव न घेता लगावला.
वर्षभरात मोठे रूग्णालय उभारणार
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुद्याला पुर्णविराम द्या. येणार्या एका वर्षात सावंतवाडीत हॉस्पिटल उभारण्याची जबाबदारी घेतो. लवकरच त्याचे भूमिपुजन करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला आहे.