आशा सेविका, कर्मचाऱ्यांना २०१९ मधील पल्स पोलिओ मोहिमेचे मानधन अद्याप नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:18 IST2020-12-22T18:16:08+5:302020-12-22T18:18:06+5:30
Zp Health News- जानेवारी २०१९ मधील महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत आशा सेविकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना पल्स पोलिओ मोहिमेचे काम करूनही आजतागत एकही रुपया मानधन अजूनही खात्यावर जमा झालेला नाही. हा हलगर्जीपणा आम्ही खपवून घेणार नाही. लवकरात लवकर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा असा इशारा लॉरेन्स मान्यकर यांनी आरोग्य समिती सभेत केला .

आशा सेविका, कर्मचाऱ्यांना २०१९ मधील पल्स पोलिओ मोहिमेचे मानधन अद्याप नाही
ओरोस : जानेवारी २०१९ मधील महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेत आशा सेविकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना पल्स पोलिओ मोहिमेचे काम करूनही आजतागत एकही रुपया मानधन अजूनही खात्यावर जमा झालेला नाही. हा हलगर्जीपणा आम्ही खपवून घेणार नाही. लवकरात लवकर त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा असा इशारा लॉरेन्स मान्यकर यांनी आरोग्य समिती सभेत केला .
आरोग्य समिती सभा सभापती सावी ओके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, सदस्य प्रितेश राऊळ, लॉरेन्स मान्यकर हरी खोबरेकर आदीसह खातेप्रमुख उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या २०१९ च्या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र आज अखेर त्यांचे पगार (मानधन) त्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. असे मान्येकर म्हणाले. आता दुसरे वर्षे जानेवारी २०२१ ची पल्स पोलिओ मोहीम काही दिवसात येणार आहे. तीचे तरी मानधन वेळेवर मिळेल का ? असा सवाल उपस्थित केला असता, डॉ. खलिपे म्हणाले, पेमेंट स्लिपवर खराबी झाल्यामुळे त्यांचे पगार तसेच राहिल्याने आता हे पगार या डिसेंबर व जानेवारी २०२१ या महिन्यात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
क्लार्कच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या खात्यावर पैसेच जमा झाले नाही. हे पगार अडकून राहिले.जिल्ह्यातील आरोग्य सेवेत काम करणाऱ्या एनआर एचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना २०१८ सालापासून वेतन मिळालेले नाही. त्यातील पगाराचा फरकातील तफावत दूर करून त्यांचे वेतन देण्यात यावे अशी मागणी मान्येकर यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी खलीपे यांनी वेतन हे डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत अदा करण्यात येईल. असे स्पष्ट केले.
मास्क, सॅनिटायझर, ॲम्बुलन्सवरून जोरदार चर्चा
जिल्ह्यात मास्क व सॅनिटायझरची अजूनही गरज आहे. तरी आमच्या मालवण तालुक्यात त्याचे जास्तीत जास्त वाटप होणे गरजेचे आहे. अशी मागणी सदस्य हरी खोबरेकर यांनी केली. यावर सदस्य प्रितेश राऊळ म्हणाले, अनेक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरमध्ये भ्रष्टाचार होत आहे ते विकत घेऊ नये. आपल्या जिल्हाचे नाव खराब होईल. आम्हाला पाच वर्षे झाली आम्ही एक- एक ॲम्बुलन्सची मागणी करत आहोत . ती गरजेची मागणी आहे . लवकरात लवकर देण्यात यावी. यावर समिती सभापती सावी लोके व सदस्यांच्या आपापसात जोरदार चर्चा रंगली.